![]()
पुणे शहरात वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता ‘रिअल टाइम ट्रॅफिक डेटा’चा वापर करणार आहे. विविध यंत्रणांकडून मिळणारा वाहतूक आणि प्रवासविषयक डेटा एकत्र करून, त्या आधारे वाहतूक नियोजन, रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव पथ विभागाने तयार केला आहे. या प्रकल्पासाठी ‘पुणे अर्बन मोबिलिटी सेल’ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तीन वर्षांसाठी ‘अर्न्स्ट अँड यंग एलएलपी’ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या कामासाठी दरवर्षी २ कोटी ३७ लाख रुपये (करविरहित) खर्च अपेक्षित असल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. महापालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वय साधण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन कक्ष उभारण्यात येणार आहे. ढोले रस्ता परिसरात प्रस्तावित या कक्षात महापालिकेचे सुमारे दहा कर्मचारी आणि एससीएमटीआरची टीम कार्यरत राहणार असल्याची माहिती अध्यक्ष भिमाले यांनी दिली. या डेटा संकलनामध्ये टॉम टॉम, दूरसंचार कंपन्यांकडून मिळणारी प्रवासविषयक माहिती, सीसीटीव्ही फुटेज, महाप्रीत, पुणे अर्बन ॲप, रोड मित्र, जीपीएस आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहनतळ व्यवस्थापन आणि नागरिक तक्रार निवारण प्रणालीतील माहितीचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, रस्ते मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (RAMS), जीआयएस, रस्ता बांधकाम व्यवस्थापन प्रणाली आणि ट्रेंचिंग पोर्टलवरील माहिती देखील एकत्रित केली जाईल. या सर्व माहितीच्या आधारे एक एकात्मिक वाहतूक नियोजन व व्यवस्थापन मंच विकसित केला जाईल. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे, वारंवार अडथळे निर्माण होणारे मार्ग आणि अपघातप्रवण क्षेत्रे तात्काळ ओळखणे शक्य होईल, ज्यामुळे त्वरित उपाययोजना करता येतील. या डेटाचा उपयोग सिग्नल समन्वय, मार्ग नियोजन, वाहनतळ व्यवस्थापन, चौकांची पुनर्रचना तसेच पदपथ आणि सायकल मार्गांच्या विकासासाठीही केला जाईल. विशेष म्हणजे, वाहतूक कोंडीचा संबंध खड्डे, रस्त्यांची खराब अवस्था, सेवा वाहिन्यांसाठी केलेले खोदकाम आणि नागरिकांच्या तक्रारींशी जोडून समस्येच्या मूळ कारणांचा शोध घेतला जाईल. उपाययोजना करण्यापूर्वी आणि त्यानंतर वाहतुकीवर झालेला परिणाम देखील मोजला जाईल. ‘रिअल टाइम’ डेटाच्या आधारे फ्लायओव्हर, ग्रेड सेपरेटर आणि इतर वाहतूक प्रकल्पांची आवश्यकता निश्चित करण्यास मदत होईल. यामुळे केवळ कोंडी झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी, भविष्यातील वाहतुकीचा अंदाज घेऊन नियोजन करण्यावर भर दिला जाईल. याशिवाय, रस्ते मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (RAMS) इतर डिजिटल डेटाबेसशी समन्वय साधल्यास, मर्यादित निधी कोणत्या रस्त्यांवर प्रथम खर्च करावा, कोणते रस्ते मजबूत किंवा पुनर्बांधणी करावेत आणि भविष्यातील देखभालीसाठी किती निधी लागेल, याबाबत निर्णय घेणे सोपे होईल.
Source link
पुणे वाहतूक नियोजनासाठी आता 'रिअल टाइम' डेटा वापरणार:विविध यंत्रणांकडून उपलब्ध डेटा एकत्र करून निर्णय