![]()
मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेला कल्याणचा 28 वर्षीय तरुण अभिषेक घोणे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाले असून, त्यात कल्याण-डोंबिवलीतील एकूण चार जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत अभिषेकचा मागील तीन दिवसांपासून कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे तो सुखरूप परतावा, या आशेवर त्याचे कुटुंबीय आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत. शासनाने अभिषेकचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्याबाबतची अद्ययावत माहिती द्यावी, अशी आर्त मागणी घोणे कुटुंबीयांनी केली आहे. यासोबतच, केंद्र व राज्य सरकारसह संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने मदतकार्य राबवून नेपाळमधील पुरात बेपत्ता झालेल्या सर्व नागरिकांचा युद्धपातळीवर शोध घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. अभिषेकच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, अभिषेक 24 तारखेला काठमांडूला गेला होता. तिथून सम्राट टुर्सच्या माध्यमातून तो मानससरोवर यात्रेसाठी रवाना झाला आणि तिथल्या बुद्ध गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाला थांबला. रात्री साडे दहा वाजता त्याने फोन करून कुटुंबाशी संवाद साधला आणि तिथले फोटो पाठवले. बोलणे झाल्यानंतर तो झोपला. मात्र बुधवारनंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. अभिषेक बेपत्ता झाल्यापासून कुटुंबाने शासनाच्या संबंधित वेबसाइटवर त्याची सर्व माहिती नोंदवली आहे; मात्र अद्याप तिथून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रकरणी कल्याण बाजार पोलिस ठाण्यात रीतसर तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ‘शासनाने आमच्या मुलाचा लवकरात लवकर शोध घ्यावा,’ अशी आर्त साद अभिषेकच्या वडिलांनी सरकारला घातली असून, ही भावनिक विनंती करताना त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले. ‘आता दरवाजा उघडेल आणि माझा भाऊ..’ रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त बहिणीने भावाच्या मनगटावर बांधण्यासाठी राखी सजवून ठेवली असली तरी घरात भाऊच उपस्थित नाही. “आता दरवाजा उघडेल आणि माझा भाऊ हसत हसत घरात येईल,” याच एका आशेवर बहीण डोळ्यांत पाणी आणून एकसारखी दरवाजाकडे पाहत आहे; मात्र सणाच्या दिवशीही बेपत्ता भावाचा कोणताही पत्ता लागत नसल्याने संपूर्ण घरामध्ये भयाण शांतता आणि दुःखाचे सावट पसरले आहे.
Source link
मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेला कल्याणचा तरुण बेपत्ता:'आमच्या मुलाला शोधून द्या', अभिषेकच्या कुटुंबीयांचा आक्रोश