![]()
नेपाळच्या हिंदूराष्ट्राच्या मुद्द्यावरून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नेपाळ हिंदूराष्ट्र असल्याचं सांगणाऱ्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील लालबाग परिसरात गणपती आगमनावेळी घडलेल्या कथित गैरप्रकारावर मात्र एक शब्दही उच्चारला नाही, असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. नवनाथ बन म्हणाले की, नेपाळ हिंदूराष्ट्र आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. नेपाळला मदत करण्यासाठी भारत सरकार सक्षम आहे. मात्र, मुंबईतील लालबागमध्ये गणपती आगमनाच्या वेळी समाजकंटकांकडून जो प्रकार घडला, त्याचा निषेध करण्याची साधी हिंमतही ठाकरे गटाने दाखवली नाही. संजय राऊत यांनी याबाबत साधं वक्तव्यही केलं नाही. ज्या मुंबईमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची गर्जना केली, त्याच मुंबईत गणपती आगमनावेळी गैरकृत्य घडत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत राऊतांनी बोलू नये नवनाथ बन म्हणाले की, मी राष्ट्रवादीचा प्रवक्ता नाही, राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, या राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बन यांनी राऊतांवर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे विलीनीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. संजय राऊत यांना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये जावं, उबाठा गटानेही काँग्रेसमध्ये किंवा समाजवादी पक्षात विलीन व्हावं, यासाठी राऊत प्रयत्नशील आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काम करावं, यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत. उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सुपारी राऊतांनी घेतली आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. 2024 मध्ये जनतेने तुम्हाला घरी बसवलं नवनाथ बन म्हणाले की ,2024 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला घरी बसवलं. त्यामुळे कोर्टाच्या, न्यायव्यवस्थेच्या किंवा निवडणूक आयोगाच्या छाताडावर बसण्याच्या गप्पा संजय राऊतांनी करू नयेत. महाराष्ट्र चालवण्याची लायकी तुमची नाही, हे जनतेने सांगितलं आहे. त्यामुळे जनतेचा कौल लक्षात घेऊन संजय राऊत यांनी वक्तव्यं करावीत.
Source link
लालबागच्या घटनेवर राऊत गप्प का?:महाराष्ट्र चालवण्याची लायकी नाही, हे जनतेने सांगितलं’; नवनाथ बन यांचा उबाठाला टोला