![]()
पुणे शहरात हडपसर-सासवड रस्त्यावर एका पादचारी तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना वडकी नाला परिसरात घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव तपसी जगदीश पासवान (वय 38, रा. वडकी नाला, सासवड रस्ता) असे आहे. तो मजुरीचे काम करत होता. पासवान याची पत्नी अमृतादेवी (वय 28) हिने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पासवान रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पासवानचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला असून, पोलिस उपनिरीक्षक शंभुराज जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, शहरात आणखी एका ठिकाणी दुचाकीच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील (आरटीओ) मेट्रो स्थानक परिसरात घडली. या अपघातातील मृत पादचाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी विश्वनाथ नाळकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओ मेट्रो स्थानक परिसरातून रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने एका पादचाऱ्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत पादचाऱ्याचे वय अंदाजे 50 वर्षे असून, त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौगुले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
पुण्यात सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू:भरधाव चारचाकी चालकाविरुद्ध फुरसुंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल