![]()
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कौटुंबिक वादातून एका मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. सविता सुरेश हरिभक्त (वय 48, रा. शांतीनगर वसाहत, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा अनिकेत (वय 30) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता आणि अनिकेत यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादातून अनिकेतने आईला मारहाण केली. मारहाणीत सविता गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील सविता यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मध्यरात्री अनिकेतला अटक करण्यात आली. अनिकेत विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. प्राथमिक चौकशीत त्याने कौटुंबिक वादातून आईचा खून केल्याची कबुली दिली आहे. खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Source link
पुण्यात मुलाने कौटुंबिक वादातून आईचा खून केला:आरोपी अनिकेतला अटक, पोलिसांकडून तपास सुरू