Headlines

प्रवचन:अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणारे पुण्य कमावण्याचा दिवस- शांतीगिरी महाराज




प्रतिनिधी | वेरूळ अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणारे पुण्य कमावण्याचा दिवस. जनार्दन स्वामी यांनी आयुष्यभर ‘धर्म, सेवा व शांती’ या त्रिसूत्रीचा प्रचार केला. त्यांचे जीवन म्हणजे निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असा हितोपदेश शांतीगिरी महाराज यांनी दिला. अक्षय्य तृतीया या दिनाचे औचित्य साधून येथे जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या जन शांती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या मध्यवर्ती कार्यक्रमात महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी हजारो भाविकांना मार्गदर्शनपर प्रवचन केले. सकाळी विधिवत पूजा, अभिषेक व लक्ष्मीनारायण यांच्या मंत्रोपचाराने सोहळ्याला प्रारंभ झाला. अक्षय्य तृतीया हा दिवस दान, जप-तप व पुण्यकर्मासाठी अक्षय फलदायी मानला जातो. याच दिवशी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांनी धर्मकार्याला सुरुवात केली होती अशी माहिती मिळते. महाराजांनी जनार्दन स्वामींच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, स्वामीजींनी गोरगरीब, अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, आरोग्य व अध्यात्म या क्षेत्रांत भरीव योगदान दिले. १९८९ मध्ये जनार्दन बाबांच्या महानिर्वाणानंतर शांतीगिरी महाराजांनी त्यांच्या कार्याची धुरा खांद्यावर घेतली. त्यानंतर देश-विदेशात शांती, बंधुता व अध्यात्माचा संदेश पोहोचवण्यासाठी त्यांना ‘महामंडलेश्वर’, ‘विश्वशांतिदूत’ तसेच ‘अध्यात्म शिरोमणी’ व जगद्गुरू यांसारख्या उपाधींनी सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमात उदकुंभदान, अन्नदान व वस्त्रदान करण्यात आले. ‘एष धर्मघटो दत्तो ब्रह्माविष्णुशिवात्म कः’ या मंत्राने शेकडो भाविकांनी घटदान केले. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात व मध्य प्रदेशातून सुमारे हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. विश्वशांती व मानवतेचा संदेश देत शांतीगिरी महाराजांच्या प्रवचनाने सोहळा संस्मरणीय ठरला . गरजूला मदत करण्याचा संकल्प करा रविवारच्या प्रवचनात महाराजांनी तरुण पिढीला आवाहन केले की, मोबाइल व भौतिक सुखांच्या मागे धावताना आपली संस्कृती व संस्कार विसरू नका. अक्षय्य तृतीयेला केलेले दान, ज्ञानदान व सेवाकार्य पिढ्यान््पिढ्या पुण्यसंचय करते. जनार्दन स्वामींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने किमान एका गरजूला मदत करण्याचा संकल्प करावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *