Headlines

हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन होणार:उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नागरी व पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन दिले निर्देश




उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी हिंजवडी परिसरातील नागरी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची वेळेत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. हिंजवडी परिसरातील नागरी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तसेच ‘माण’ आणि मारुंजी परिसरातील नागरिकांच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. परिसराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पीएमआरडीएने तयार केलेल्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती देण्यासह विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, हिंजवडी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग आहे. येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. हिंजवडीमध्ये पीएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महापालिका, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि ग्रामपंचायती अशा अनेक यंत्रणा काम करतात. या सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय असावा यासाठी चाकणच्या धर्तीवर हिंजवडीसाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंजवडी परिसराच्या विकासासाठी नेहमीच आग्रही असत, याची आठवणही त्यांनी करून दिली. अजित पवार यांनी या परिसराचा पाहणी दौरा करून विकास कामांचा आढावा घेतला होता आणि अनेक प्रश्न सोडवले होते, असेही त्या म्हणाल्या. पीएमआरडीएने तयार केलेल्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची वेगाने अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना तातडीने बैठक आयोजित करण्याची विनंती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. संबंधित विभागांनी आपल्या कामाची ‘ब्लूप्रिंट’ तयार करून तातडीने कार्यवाही सुरू करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. रस्ते, मेट्रो, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणी आणि वीजपुरवठा या प्रश्नांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची दर आठवड्याला समन्वय बैठक घेण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस मनुष्यबळ वाढवणे, सीसीटीव्ही बसवणे तसेच आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजनांची वेगाने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक नागरिक तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *