Headlines

नांदगाव तहसीलमध्ये अनेक पदे रिक्त:नायब तहसीलदार, एफएसआय, शिपायांसह मंडळ अधिकाऱ्यांचीही पदे रिकामी; नागरिकांची कामे रखडली




नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची दोन, अन्नधान्य निरीक्षकाचे (एफएसआय) एक आणि शिपायाची दोन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे निराधारांच्या मानधनासह सामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत. या रिक्त पदांमध्ये निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार आणि संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदारांचा समावेश आहे. याशिवाय अन्नधान्य निरीक्षण अधिकाऱ्याचे एक पद आणि शिपायांच्या दोन जागाही रिकाम्या आहेत. या रिक्त पदांचा परिणाम केवळ कार्यालयीन कामकाजापुरता मर्यादित नाही, तर त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. विविध दाखले, महसूलविषयक कामे, शासकीय योजनांशी संबंधित प्रक्रिया, रेशन कार्डमधील दुरुस्त्या, निवडणूकविषयक कामे आणि निराधार योजनेच्या कामांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामे होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रिक्त पदांमुळे कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे हे अधिकारी आणि कर्मचारी बदलीच्या मानसिकतेत असल्याचे दिसत आहे. यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. विशेषतः संजय गांधी निराधार योजना विभागातील पद तातडीने भरून निराधार, वृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांची कामे सुरळीत करावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रभारी व्यवस्थेवर महसूल प्रशासनाचा कारभार आणखी किती दिवस चालणार आणि नागरिकांना आपल्या हक्काच्या शासकीय सेवांसाठी किती काळ वाट पाहावी लागणार, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, महसूल मंत्री आणि पालकमंत्री यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या तहसील कार्यालयातील अनेक कामे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहेत. एका अधिकाऱ्याकडे अतिरिक्त विभागाची जबाबदारी असल्याने मूळ कामासोबत अतिरिक्त कामकाजही सांभाळावे लागत आहे. यामुळे अधिकारी-कर्मचारी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असले तरी, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. याशिवाय, मंगरुळ चव्हाळा आणि पापळ येथील मंडळ अधिकाऱ्यांची दोन पदेही रिक्त आहेत. येवती, कणी मिर्झापूर, सालोड, शिवरा आणि कोहळा जटेश्वर येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांची पदेही रिकामी आहेत. तसेच धामक, मांजरी, कणी मिर्झापूर, कोठोडा आणि धानोरा फसी येथील कोतवालांची पदेही रिक्त आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *