Headlines

कल्याण काँग्रेसच्या बैठकीत मोठा राडा:महिला नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांच्या कानशिलात लगावली; नाश्त्याच्या वादातून राडा




कल्याण काँग्रेसमध्ये शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडला असून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांना भर बैठकीत मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाश्त्याच्या व्यवस्थेवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान थेट मारहाणीत झाल्याने काँग्रेसच्या शिस्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी सायंकाळी कल्याण पूर्वेकडे ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीनंतर कार्यकर्त्यांच्या नाश्त्याच्या व्यवस्थेवरून चर्चा सुरू असताना वादाची ठिणगी पडली. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याची माहिती एका कार्यकर्त्याने कुलकर्णी यांना दिली. यामुळे संतापलेल्या कुलकर्णी यांनी थेट पातकर यांना गाठले आणि सर्वांसमोर त्यांच्या कानशिलात लगावली. या अनपेक्षित प्रकारामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला आणि उपस्थित कार्यकर्ते अवाक झाले. माझ्या कृत्याचा पश्चाताप किंवा खंत नाही – कांचन कुलकर्णी या धक्कादायक प्रकारानंतर बैठकीत एकच गोंधळ उडाला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “जिल्हाध्यक्षांनी महिला कार्यकर्त्यांबाबत अर्वाच्य भाषा वापरली. मी त्यांना जाब विचारला असता त्यांनी पुन्हा तोच उद्धटपणा केला. एका महिला लोकप्रतिनिधीबद्दल अशी भाषा वापरणे अयोग्य आहे, म्हणूनच मी त्यांच्या कानशिलात लगावली आणि मला या कृत्याचा कोणताही पश्चाताप किंवा खंत नाही.” भाजपचा काँग्रेसवर निशाणा या घटनेवर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले आहे की, काँग्रेसमध्ये महिलांना आदर दिला जात नाही आणि हीच त्या पक्षाची संस्कृती आहे. बैठकीत घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असून अशा घटना कोणत्याही पक्षात घडू नयेत. पक्षांतर्गत कारवाईकडे सर्वांचे लक्ष या प्रकारामुळे कल्याण काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे. जिल्हाध्यक्षांनी महिला नगरसेविकेचा अपमान केला की नगरसेविकेने शिस्तभंग केला, याबाबत आता प्रदेश नेतृत्वाकडे तक्रारी जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पक्ष नेतृत्व जिल्हाध्यक्ष पातकर यांच्यावर की नगरसेविका कुलकर्णी यांच्यावर कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… मोहन भागवतांच्या सुरक्षेचा खर्च सरकारवर का?:उच्च न्यायालयात जनहित याचिका; हा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिल्या जाणाऱ्या ‘Z Plus’ दर्जाच्या सुरक्षेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या सुरक्षेसाठी होणारा खर्च सरकारी तिजोरीतून केला जात असल्याने तो संबंधित व्यक्तीकडूनच वसूल करावा, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमुळे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *