![]()
राज्य सरकार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा दिलासा देण्याच्या भूमिकेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयाविषयी सकारात्मक आहेत. त्याअनुषंगाने आवश्यक माहिती गोळा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी गरजेपोटी पीक कर्ज किंवा इतर कर्ज घेतात. नवीन घेतलेल्या कर्जाचा भरणा शेतकरी करत असले तरी, त्यांच्या थकबाकी कर्जाबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल. ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. सध्या युरिया खताचा तुटवडा जाणवत असून, त्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे कृषी मंत्री म्हणाले. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन भरणे यांनी दिले. धरणातील उपलब्ध पाणी आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून जलसंपदा विभागामार्फत शेतकऱ्यांना आगामी काळात आवश्यक पाणी दिले जाईल. मान्सून काळात शेतकऱ्यांनी शेततळे यांसारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, ज्यात सरकार मदत करेल. यावर्षी सरासरीच्या ९२ ते ९३ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे. राज्याची बियाण्यांची गरज २० लाख क्विंटल असून, सध्या २८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. आगामी काळात तापमान वाढणार आणि पाऊस कमी पडणार असल्याने काही कामांना प्राधान्य दिले जाईल. पेरणी करताना उभी पेरणी करण्याऐवजी आडवी पेरणी करावी, कमी पाण्याचे पीक घ्यावे आणि खताचा मर्यादित व आवश्यक तेवढाच वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. कोणत्या शेतकऱ्यांनी किती युरिया नेला आहे, याबाबत तपासणी केली जात आहे. अनेकांनी ४० बॅग युरिया नेल्याबाबत संशय असून, त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली.
Source link
शेतकऱ्यांना २ लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरच:मुख्यमंत्री याविषयी अत्यंत सकारात्मक, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती