Headlines

महिलांच्या नावाखाली डिलिमिटेशन बिल आणण्याच प्रयत्न:मोदी आणि शाह यांची स्ट्रॅटेजी यंदा फेल गेली; प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका




लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) संबंधीचे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या वादात आता सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून, भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “हे महिला आरक्षण विधेयक नसून देशाला उत्तर आणि दक्षिण भागात विभागण्याचे ‘डिलिमिटेशन’ बिल होते. मोदी-शाह यांची स्ट्रॅटेजी यंदा फेल गेली,” अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली. प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या रणनीतीवर टीका करताना म्हटले की, विरोधकांना महिलाविरोधी ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न फसला आहे. “सरकारची स्क्रिप्ट तयार होती की विरोधकांना महिलाविरोधी दाखवायचे, पण हा डाव त्यांच्यावरच उलटला. पंतप्रधान मोदींच्या भाषणाखालील कमेंट्स वाचल्या तर लक्षात येईल की, लोक त्यांना ट्रोल करत आहेत. हे ट्रोल करणारे लोक मूळ नागरिक आहेत, १७ एप्रिल २०२६ रोजी तयार केलेली फेक अकाउंट्स नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला. हिंमत असती तर २०२४ मध्येच आरक्षण दिले असते जर महिलांना न्याय द्यायचा होता, तर सध्याच्या ५४३ जागांमध्येच आरक्षण का लागू केले नाही? तुम्ही अजून महिलांचा किती वापर करणार आहात? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी सरकारला केला. तुमची हिंमत असती, तर तुम्ही २०२४ मध्ये आरक्षण लागू केले असते. एक्झिस्टिंग ५४३ मध्ये तुम्ही का लागू करत नाहीत? जागा वाढवून (५४३ वरून ८५०) इथे तुम्ही तुमच्या बाहुबलींना, सगळ्या गुंडांना मजबूत करत आहात. आरक्षण म्हणजे असलेल्या जागांमधून हिस्सा देणे. तुम्ही अतिरिक्त जागा वाढवून महिलांना फसवताय, याचाच अर्थ तुम्हाला महिलांना प्रत्यक्ष आरक्षण द्यायचेच नाहीये, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली. डिलिमिटेशनच्या नावाखाली देशाची अखंडता मोडण्याचा प्रयत्न? प्रणिती शिंदे यांनी या विधेयकाच्या तांत्रिक बाजूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिला आरक्षणाचे बिल २०२३ मध्येच संमत झाले आहे. मग आता पुन्हा हा घाट कशासाठी? दोन राज्यांच्या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी देशाची अखंडता धोक्यात आणली जात आहे. उत्तर आणि दक्षिण भारत वेगळा करण्याची ही रणनीती असल्याचे त्यांनी म्हटले. या विधेयकात कुठेही ५० टक्के आरक्षणाचा ठोस उल्लेख नव्हता. संविधानात छेडछाड करण्याच्या प्रयत्नावरून सरकारचे अधिकाऱ्यांशीही वाद झाले होते, असा खळबळजनक दावाही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला. आरएसएस महिलांना तुच्छ मानते आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणीवर हल्ला चढवताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, “आज जे लोक काँग्रेसला महिलाविरोधी म्हणत आहेत, त्याच आरएसएसने आजवर महिलांना तुच्छ वागणूक दिली आहे, त्यांना खालचे स्थान देतात. महिला महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत आणि हेच लोक महिलांच्या संरक्षणाचे दावे करत आहेत. यातूनच स्पष्ट होते की खऱ्या अर्थाने महिलाविरोधी कोण आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *