![]()
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे शहरात विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टने वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, महाप्रसाद आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, आरोग्य शिबिर, औषध वाटप तसेच चरण मसाज सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवा उपक्रमाला वारकरी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषतः, महाप्रसाद सेवेचा जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत लाखो भाविक पुणे शहरात मुक्कामी असतात. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम राबविले जातात. यंदाही ‘सेवा हीच साधना’ या भावनेतून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वारकऱ्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास, पायी वारी आणि शारीरिक थकवा लक्षात घेऊन आरोग्य तपासणी व औषध वाटपाची सुविधा करण्यात आली होती. या शिबिरात वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधांचे मोफत वाटप झाले. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी चरण मसाज सेवाही आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत आलेल्या वारकरी भाविकांच्या सेवेसाठी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्यावतीनेही विशेष वैद्यकीय सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी सेवा आणि औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. याशिवाय, ट्रस्टच्यावतीने वारकरी भाविकांसाठी प्रसाद म्हणून १५ हजार गुडदाणीच्या पाकिटांचे वाटपही करण्यात आले. आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकरी भाविकांना पायी वारी करताना होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. सांधेदुखी, स्नायूंचा त्रास आणि थकवा यासाठी फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. गरजू वारकऱ्यांना आवश्यक औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले. या वैद्यकीय सेवा उपक्रमासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित होते आणि वारकऱ्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ट्रस्टतर्फे विशेष नियोजन करण्यात आले होते.
Source link
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबीर:8 ते 10 हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ