![]()
विषारी गावठी दारू प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाने त्यांना 1 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सखोल तपासासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. आर्यन संजीव धोत्रे (वय 24) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (वय 29) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हडपसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मकोका) कलमे लावण्यात आली आहेत. संघटित टोळीने आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारूमध्ये मिथेनॉलसारखे विषारी रसायन मिसळून तिची विक्री केल्याचा आरोप आहे. या विषारी दारूच्या सेवनामुळे हडपसर आणि दापोडी परिसरातील एकूण 21 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. काही नागरिक गंभीर आजारी पडल्याचेही तपास अहवालात नमूद आहे. या गुन्ह्यातील संघटित टोळीचा प्रमुख दत्ता ऊर्फ भाऊ भीमराव लोंढे अद्याप फरार असून, अन्य काही आरोपींना अटक करणे बाकी आहे. सरकारी वकील नितीन कोंघे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपींनी मिथेनॉल व इतर रसायने कोठून आणली, विषारी दारूची निर्मिती नेमकी कुठे केली, तिचे वितरण कोणामार्फत झाले आणि त्यातून मिळालेल्या पैशांचा वापर कसा करण्यात आला, याचा तपास करणे बाकी आहे. आरोपींचे बँक व्यवहार, जंगम आणि स्थावर मालमत्ता, गुन्ह्यात वापरलेली वाहने तसेच टोळीतील सदस्यांचे परस्पर संबंध यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेता, प्रभारी विशेष न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी आरोपींना 1 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अपर पोलिस अधीक्षक राजेंद्र मस्के करत आहेत.
Source link
हडपसर विषारी दारूकांड प्रकरणी दोघांना अटक:21 मृत्यू प्रकरणी मकोका कारवाई; टोळीप्रमुखासह इतरांचा शोध सुरू