Headlines

प्रसारमाध्यमांना सभेत बंदी केल्याने काँग्रेसचे मनपामध्येच थेट धरणे:भाजपने लोकशाहीची हत्या केली: दिवेकर यांचा आराेप‎




प्रसारमाध्यमांना वृत्तसंकलन करण्यासाठी महापालिकेच्या सभागृहात प्रवेश बंदी केल्याच्या कारणावरुन कॉग्रेसने मंगळवारी (दि.२५) मनपा कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन केले. भारतीय जनता पार्टीने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप यावेळी माजी उपमहापौर निखीलेश दिवेकर यांनी केला. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरासंबंधित महत्वपूर्ण निर्णय होत असतात. यावेळेस सभेत प्रत्यक्ष उपस्थित राहून थेट वृत्तसंकलन करण्याचा पत्रकारांना अधिकार असतो. परंतु नुकतेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जागेच्या आभावाचे खोटे कारण सांगून पत्रकारांना प्रवेश बंदी केली आहे. खरे तर महापालिका प्रशासन जिल्हाधिकारी येथील नियोजन सभागृह अथवा आकाशवाणी समोरील जिल्हा परिषदचा नवीन हॉल भाड्याने घेऊ शकते. परंतु, सत्ताधाऱ्यांना जनतेसमोर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे सत्य उघड होऊ द्यायचे नाही, म्हणून लोकशाहीचे चौथे स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांना सभेस मनाई केली जात आहे, असा आरोप धरणे आंदोलनाचे आयोजक माजी उपमहापौर निखीलेश दिवेकर यांनी केला आहे. हे एक दिवसीय धरणे आंदोलन महापालिका कार्यालयाजवळ पार पडले. याप्रसंगी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यापैकी प्रामुख्याने विरोधी पक्ष नेता झिशान हुसेन, नगरसेवक आजाद खान, नगरसेविका निलोफर खान, प्रशांत गावंडे, माजी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रदेश सचिव अक्षय राऊत, मनीष मिश्रा, यशोदा गायकवाड, विजय तिवारी, तश्वर पटेल, सुगत भटकर, आक्रोश सायखेडे, अतुल अमानकर, सत्यप्रकाश घाटोळे, सोहेल खान, सुरेश ढाकोळकर, दत्ता आमले, जनार्दन बुटे, अस्लम शहा, अनिस सौदागर, महादेव मेहेंगे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *