Headlines

अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आजोबाला जन्मठेप अन् 70हजारांचा दंड:वडगाव मावळ पोक्सो न्यायालयाचा निकाल




अल्पवयीन नातीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 61 वर्षीय आजोबाला जन्मठेप आणि 70 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वडगाव मावळ येथील विशेष पोक्सो न्यायालयाने हा निकाल दिला. विशेष न्यायाधीश दत्तात्रेय अनभुले यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ही घटना एप्रिल ते नोव्हेंबर 2024 दरम्यान घडली. मुलीच्या आईने देहूरोड पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेमके प्रकरण काय? मुलीचे आई-वडील कामावर गेल्यानंतर आरोपी तिच्या घरी येत असे. तो मुलीच्या लहान भावंडांना टीव्ही पाहण्यासाठी किंवा बाहेर खेळायला पाठवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. मुलीच्या वागण्यातील बदल लक्षात आल्यावर आईने तिची विचारपूस केली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या आईने देहूरोड पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. तत्कालीन सहायक निरीक्षक अनिता दुगावकर यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले. जन्मठेपेसह 70 हजार रुपये दंड विशेष सरकारी वकील संतोष परदेशी आणि ॲड. लालचंद ओसवाल यांनी या खटल्यात पाच साक्षीदार तपासले. पीडित मुलीने अत्यंत धीराने न्यायालयासमोर साक्ष नोंदविली. मुलीच्या आईची साक्ष, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे याला सुसंगत ठरले. ॲड. ओसवाल यांनी युक्तिवाद केला की, आरोपीने वारंवार केलेला हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्याला कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी. न्यायालयाने दंडाची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशात नमूद केले आहे. आरोपीकडून नातेसंबंधांचा गैरफायदा आरोपीच्या वकिलांनी आर्थिक फायद्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा बचाव केला होता, तो न्यायालयाने फेटाळला. भारतीय समाजव्यवस्थेत कोणतीही मुलगी किंवा तिचे पालक असे खोटे आरोप करणार नाहीत, ज्यामुळे मुलीचे भविष्य आणि वैवाहिक संबंध धोक्यात येतील, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. मुलीच्या आईचा काका असलेल्या या वृद्धाने नातेसंबंधांचा गैरफायदा घेऊन हा गुन्हा केला आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *