![]()
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निवड झाल्यावर शिंदेसेनेचे नेते सचिन अहिर पहिल्यांदाच नागपुरात आले. शिवसेना नागपूर लोकसभातर्फे चिटणवीस सेंटर येथे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या कार्यक्रमात विधानपरिषद आमदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव आणि जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांच्या हस्ते उपसभापती अहिर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना अहिर यांनी विदर्भात पक्षाची ताकद वाढवून संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागपूरसह संपूर्ण विदर्भाबद्दल आपल्याला विशेष आपुलकी असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे ते म्हणाले. येत्या काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावात शिवसैनिक पोहोचले पाहिजेत, हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून पक्षसंघटन तळागाळापर्यंत मजबूत करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यासोबतच विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या माध्यमातून विदर्भाचे प्रलंबित प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रादेशिक विकासाच्या मुद्द्यांना सभागृहात न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या सत्कार सोहळ्याला शिवसेनेचे शहरातील वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेनेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
उपसभापती सचिन अहीर यांचा नागपुरात सत्कार:विदर्भात शिवसेना वाढवण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन