Headlines

ठाण्यातील भव्य डेटा सेंटरला आदित्य ठाकरेंचा विरोध:म्हणाले- तंत्रज्ञानाला विरोध नाही, पण शहराच्या मध्यभागी प्रकल्प का?




ठाण्यामध्ये उभारण्यात येत असलेल्या 22 मजली भव्य डेटा सेंटरमुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत त्यांनी थेट सवाल केला की, डेटा सेंटर या तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही, मात्र ते शहराच्या मध्यभागी आणि रहिवासी भागात का उभारले जात आहे? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ठाण्याला सुधारणारे आणि बिघडवणारे कोण आहेत हे जनतेने ओळखले पाहिजे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. परिसरातील 2 आमदार, 1 खासदार आणि 4 नगरसेवक या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकल्प ठाण्यातून घालवण्यासाठी आणि ठाणेकरांचा आवाज बुलंद करण्यासाठी राजकीय भेदभाव बाजूला ठेवून नागरिकांसोबत लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तसेच, सरकार आल्यावर ठाण्याच्या जीवावर उठलेला हा प्रकल्प हद्दपार करू, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. 24 तास 90 डेसिबलचा आवाज अवतीभवती घुमणार पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, लंडनसारख्या शहरातही छोट्या स्केलच्या डेटा सेंटरला तिथल्या स्थानिक लोकांनी विरोध केला होता. ठाण्यात 22 मजल्यांचे हे डेटा सेंटर फेज 1 आणि फेज 2 मिळून 53 एकर जागेवर होणार आहे. डेटा सेंटरला विरोध नाही, पण ते रेड झोन किंवा शहराबाहेर उभे करायला हवे. हे डेटा सेंटर सुरू झाल्यावर 24 तास 90 डेसिबलचा आवाज अवतीभवती घुमणार आहे. लाखो रुपये देऊन फ्लॅट घेणाऱ्या लोकांनी या आवाजात आणि काँक्रीटमुळे वाढणाऱ्या उष्णतेत कसे राहायचे? कूलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या एसीची गरम हवा थेट आसपासच्या रहिवाशांच्या घरावर आदळणार आहे. कुलिंगसाठी पाण्याचा अफाट वापर होणार आदित्य ठाकरे म्हणाले, या प्रकल्पाच्या कुलिंगसाठी पाण्याचा अफाट वापर केला जाणार असून 5 लाख लिटर डिझेल साठवून ठेवले जाणार आहे. इतका प्रचंड पाण्याचा आणि ऊर्जेचा वापर करून आणि स्थानिक पर्यावरण धोक्यात घालून मिळणाऱ्या नोकऱ्यांची संख्या मात्र अत्यंत कमी आहे. या डेटा सेंटरमधील डेटाचा उपयोग इतर देशांसाठी होणार असून त्रास मात्र ठाणेकरांना सहन करावा लागणार आहे. ठाण्यात 3500 झाडे तोडण्याचे काम ‘झाडांचे शहर’ अशी ओळख असलेल्या ठाण्यात 3500 झाडे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘विकास हा शाश्वत असावा’ ही भूमिका घेतली होती. परंतु सध्या फक्त ‘कॉन्ट्रॅक्टर बेस इकॉनॉमी’ चालवली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *