![]()
नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) आणि बँक ऑफ अमेरिका यांच्या ‘डान्स गुरुकुल’ उपक्रमाने देशभरातील 12 गुरुकुलांना वर्षभर शास्त्रीय नृत्यपरंपरेला आधार दिला आहे. या माध्यमातून नृत्यक्षेत्राला सातत्यपूर्ण पाठबळ मिळत आहे. कला आणि संस्कृतीचे महत्त्व वाढले असून, कॉर्पोरेट क्षेत्राचा सहभाग सकारात्मक असल्याचे एनसीपीएच्या नृत्य विभागाच्या प्रमुख स्वप्नकल्पा दासगुप्ता यांनी सांगितले. या उपक्रमाला पुण्यातील नादरूप कथक संस्थेचे सहकार्य मिळाले आहे. ज्येष्ठ कथकगुरू आणि नादरूपच्या संस्थापक पंडिता शमा भाटे यांच्या मार्गदर्शनाने या उपक्रमाला महत्त्वाचे योगदान लाभले आहे. स्वप्नकल्पा दासगुप्ता यांनी सांगितले की, गुरु, शिष्य आणि चांगला प्रेक्षक हे भारतीय नृत्यपरंपरेचे एक सुंदर वर्तुळ आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून पुण्यात नादरूप कथक संस्थेच्या सहकार्याने ‘एनसीपीए डान्स गुरुकुल’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध नृत्यगुरू प्रीती पटेल यांच्या शिष्यांनी जयदेवांच्या ‘गीतगोविंद’वर आधारित ‘प्रिये चारुशीले’ ही मणिपुरी नृत्यरचना सादर केली. या सादरीकरणातून राधा-कृष्णाचे प्रेम, विरह आणि भक्तीचे भावविश्व मांडण्यात आले. मणिपुरी नृत्याची लयबद्धता आणि भावाभिनय यामुळे सादरीकरणाला विशेष रंगत आली. यानंतर नादरूपच्या प्रमोद वाघ, श्रद्धा मुखेडे, नयन कोहळे आणि श्रेया कुलकर्णी यांनी ‘त्रिमिती’ ही कथक रचना सादर केली. यामध्ये गणेश वंदना, शिव परण आणि आमद यांचा समावेश होता. तसेच ‘कालियामर्दन’मधून कृष्णाने कालियावर मिळवलेला विजय आणि ठुमरी व तराण्याच्या माध्यमातून कथकचे विविध भाव व लयकारी दाखवण्यात आली.
या कार्यक्रमात पंडिता शमा भाटे यांच्या हस्ते स्वप्नकल्पा दासगुप्ता यांचा भारतीय शास्त्रीय नृत्याच्या संवर्धनातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. ‘एनसीपीए डान्स गुरुकुल’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पारंपरिक नृत्य प्रशिक्षणासोबतच सादरीकरण, प्रकाशयोजना, ध्वनी, कलाकारांची नोंदणी आणि अनुदानासाठी अर्ज करणे यांसारख्या व्यावसायिक कौशल्यांचीही ओळख करून दिली जाते. पुढील काळात ओडिशा, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता यांसह देशातील विविध शहरांमध्ये या उपक्रमाचा विस्तार होणार आहे.
Source link
एनसीपीए डान्स गुरुकुलने 12 गुरुकुलांना वर्षभर दिला आधार:पुणे येथे महोत्सव, पंडिता शमा भाटे यांचेही मार्गदर्शन लाभले