![]()
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सवासाठी मध्यवर्ती पेठांमधील माल वाहतुकीबाबत नवीन नियम जाहीर केले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांनुसार, 14 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2026 या काळात पहाटे 2 ते सकाळी 11 या वेळेतच हलक्या मालवाहू वाहनांना दुकानांमध्ये माल ने-आण (लोडिंग व अन-लोडिंग) करण्याची परवानगी असेल. पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील मुख्य बाजारपेठा आणि मध्यवर्ती पेठांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे रस्त्यांवर मोठ्या मालवाहू गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असते. नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये आणि शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक शाखेने ही विशेष उपाययोजना केली आहे. बोहरी आळी, गणेश पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, मंडई परिसर, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड आणि इतर मध्यवर्ती पेठांच्या भागांसाठी हे नियम लागू असतील. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या नियमांमधून वगळण्यात आले आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस वाहने आणि इतर आपत्कालीन सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि वाहतूक कोंडीमुक्त पार पाडण्यासाठी सर्व व्यावसायिक व नागरिकांनी पुणे शहर वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
Source link
पुणे गणेशोत्सवात मध्यवर्ती पेठांमध्ये माल वाहतुकीसाठी पोलिसांचे नियम:पहाटे 2 ते सकाळी 11 या वेळेतच दुकानांतील माल लोड-अनलोडिंगला परवानगी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आदेश