![]()
अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाने प्रसिद्ध वक्ते ज्ञानेश्वर महाराज बंडगर (सोलापूर) यांचे व्याख्यान ऐनवेळी रद्द केले आहे. एका अज्ञात दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे विद्यापीठाच्या वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली असून, विद्यापीठ प्रशासनावर टीका होत आहे. येत्या बुधवार, २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सिनेट सभेत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. विद्यापीठाचे महानुभाव अध्यासन केंद्र आणि हर्षराज कॉलनी येथील सर्वज्ञ सेवा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता विद्यापीठाच्या डॉ. श्रीकांत जिचकार सभागृहात बंडगर महाराजांचे व्याख्यान होणार होते. या कार्यक्रमाच्या पत्रिका छापण्यात आल्या होत्या आणि विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने शुक्रवारीच माध्यमांना या प्रबोधन व्याख्यानाची माहिती दिली होती. मात्र, बंडगर महाराजांची मांडणी वास्तववादी आणि वस्तुनिष्ठ असल्याने, त्यांचे विचार सहन न करू शकणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्याने महानुभाव अध्यासनाचे प्रमुख डॉ. महंत सोनपेठकर यांना फोन करून व्याख्यान रद्द करण्यास भाग पाडले, असा आरोप आहे. त्या सदस्याने हे व्याख्यान वादग्रस्त ठरू शकते, असे म्हटले होते. व्यवस्थापन आणि सिनेटच्या अनेक सदस्यांना संबंधित सदस्याची ही कृती आवडली नाही. डॉ. सोनपेठकर यांनी कुलगुरू किंवा कुलसचिव यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता, असे या सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे २३ सप्टेंबरच्या बैठकीत विद्यापीठ प्रशासनाला यावर जाब विचारला जाईल. विद्यापीठाने ऐनवेळी वादग्रस्त निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, कोरोना काळातील नागरिकांच्या व्यथा मांडणारी ‘ते ५० दिवस’ ही कादंबरी परीक्षेच्या तोंडावर अभ्यासक्रमातून वगळण्यात आली होती. नंतर एआयएसएफ संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर ती त्या सत्रापुरती पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली. याबाबत कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांना विचारले असता, त्यांनी हा निर्णय अध्यासन आणि बंडगर महाराज यांच्यात परस्पर झाला असल्याचे सांगितले. भविष्यात त्यांना विद्यापीठात आमंत्रित केले जाईल, असेही ते म्हणाले. सिनेट आणि व्यवस्थापन परिषद सदस्य व्ही.एम. मेटकर यांनी सांगितले की, “महानुभाव अध्यासनाने आयोजित केलेले व्याख्यान रद्द करायला सांगणारे ते कोण? मी सुद्धा त्याच प्राधिकारिणीचा सदस्य आहे. हे आमचे काम नाही. विद्यापीठ प्रशासनाने काही निर्देश दिले असते, तर तेही सकारण सांगावे लागले असते. त्यामुळे आगामी सिनेट सभेत मी ‘प्वाइंट ऑफ इन्फॉर्मेशन’ नुसार प्रशासनाला जाब विचारणार आहे.”
Source link
अमरावती विद्यापीठाने बंडगर महाराजांचे व्याख्यान दबावामुळे रद्द केले:23 सप्टेंबरला सिनेट सभेत मुद्दा गाजणार; व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यावर दबाव आणल्याचा आरोप