![]()
अमरावतीमध्ये शनिवारी संध्याकाळी ‘दे मनाचा रिता कोपरा’ हा शब्द-स्वरांचा उत्सव श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहात पार पडला. प्रख्यात गझलकार नितीन भट आणि सर्जन तथा कवी डॉ. उज्वल बारंगे यांच्या काव्यरचनांवर आधारित या कार्यक्रमाचा अमरावतीकरांनी मनसोक्त आस्वाद घेतला. या मैफिलीत प्रेम, विरह आणि दुरावा व्यक्त करणाऱ्या कविता तसेच सामाजिक आशय मांडणाऱ्या गझला सादर करण्यात आल्या. गायकीचे स्वर आणि बासरी, व्हायोलिन, सिंथसायझरची सुरेल साथ यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विविध भावभावनांचे आविष्करण करणाऱ्या मुक्तछंद, गेय कविता आणि गझलांनी रसिकांच्या मनावर गारुड केले. नितीन भट यांनी ‘पुन्हा खोटे खरे झाले’, ‘कधी ओवाळणी केली’ आणि ‘तुटत असलो जरी आतल्या आत मी’ या गझला तरन्नुममध्ये सादर केल्या. डॉ. उज्वल बारंगे यांनी ‘हातातले तू हात’, ‘दिवा विझलेला होता’ आणि ‘दगड होऊन मन मोडले पाहिजे’ ही गीते गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या काव्यवाचनात सिंथसायझरवर रामेश्वर काळे, बासरीवर चेतन वानखडे आणि व्हायोलिनवर हरीश लांडगे यांनी साथ दिली. पिलू, शुद्ध सारंग, मिया मल्हार, मिश्र पहाडी, चारुकेशी, भुपेश्वरी, गोरख कल्याण, झिंजोटी अशा रागातील सुरवटी समर्पकपणे पेरून मैफिल अधिक सुश्राव्य केली. आकर्षक प्रकाश योजनेची जबाबदारी विराग जाखड आणि सौरभ शेंडे यांनी सांभाळली, तर ग्राफिक्सचे काम ऋषिकेश मोहोळे, हर्ष शर्मा आणि त्यांच्या चमूने केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला जी. एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, सायकोथेरिपिस्ट डॉ. मोहना कुलकर्णी, पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके, आमदार प्रतापदादा अडसड, नगराध्यक्ष अर्चना रोठे, राजकीय नेते राणा रणनवरे, राजेंद्र जवळकर, डॉ. वैभव ढवळे आणि अमोल चवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नेत्ररोगतज्ञ डॉ. सचिन बगडे, मनीष नांदूरकर आणि सारंग हरणे यांनी आयोजनाची धुरा सांभाळली. तेजस्वीनी बगडे आणि डॉ. पायल रोकडे यांनी सूत्रसंचालन केले. तब्बल अडीच तास चाललेला हा सोहळा अमरावतीकर रसिकांच्या साक्षीने यशस्वीपणे पार पडला.
Source link
अमरावतीत नितीन भट, उज्वल बारंगे यांच्या कवितांचा उत्सव:'दे मनाचा रिता कोपरा' कार्यक्रमात प्रेम, विरह, सामाजिक गझलांनी रसिकांची मने जिंकली