Headlines

धुळ्यात गणपतीच्या पहिल्याच दिवशी रक्तरंजित घटना:जेवणावरून मित्रांमध्ये वाद, कुऱ्हाडीच्या वारात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू




गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडली. दिघावे गावाच्या हद्दीत मित्रांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी कुऱ्हाड आणि लाकडी काठीने केलेल्या हल्ल्यात चैत्रम दिलीप मालचे (वय 40) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी साक्री पोलिसांनी काही तासांतच दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चैत्रम मालचे हे काही मित्रांसोबत दिघावे गावाच्या हद्दीत एकत्र आले होते. यावेळी सर्वजण जेवण करत असताना जेवणाच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर परिस्थिती अचानक चिघळली. काही वेळातच वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी प्रकाश सोनावणे आणि रोहिदास जाधव यांनी चैत्रम मालचे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. प्रकाश सोनावणे यांनी कुऱ्हाडीने चैत्रम यांच्यावर वार केले, तर रोहिदास जाधव यांनी लाकडी काठीने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात चैत्रम गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ते घटनास्थळीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी पसार घटना घडल्यानंतर दोन्ही संशयित घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांचे पथक तातडीने दिघावे येथे पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही संशयितांचा माग काढला. प्रकाश सोनावणे आणि रोहिदास जाधव यांना काही तासांतच ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. पुढील तपास सुरू या घटनेमुळे दिघावे गावात खळबळ उडाली असून, मृत चैत्रम मालचे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किरकोळ वाटणाऱ्या जेवणाच्या वादातून थेट हत्या झाल्याने परिसरातही चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची चौकशी केली जात आहे. हल्ल्यामागचे नेमके कारण, वाद कशावरून सुरू झाला आणि हत्येत आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा.. जवळजवळ सर्व मागण्या पूर्ण, गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन अयोग्य:देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना आंदोलनाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन “मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने बहुतांश सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. ज्या काही उर्वरित मागण्या आहेत, त्या सध्या न्यायालयाच्या विविध टप्प्यांवर असून संविधानाच्या चौकटीतच त्यावर निर्णय होऊ शकतो. अशा वेळी गणेशोत्सवाचे पर्व सुरू असताना मुंबईत आंदोलन करणे आणि गणेशभक्तांना असुविधा निर्माण करणे कोणासाठीही योग्य नाही. त्यामुळे या आंदोलनाचा निश्चितपणे पुनर्विचार व्हावा,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *