![]()
“राज्यात पावसाने दडी मारल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके हातातून गेली तरी सरकार शेतकऱ्यांना मदत करेल, धान्याची गोदामे भरलेली आहेत, पण पाणी कुठून आणायचे हा खरा मोठा प्रश्न आहे. अशा गंभीर संकटाच्या काळात राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात स्वतः घराबाहेर न पडता काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे,” असा जोरदार टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी राज्यातील पावसाची तूट, दुष्काळी पंचनाम्यांवरून सुरू असलेला राजकीय वाद, शरद पवारांचे पत्र, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूवरील विधाने आणि राहुल गांधी यांच्या आरोपांवर सडेतोड उत्तरे दिली. गणरायाला पावसाचे साकडे; धान्य मिळेल, पण पाणी कुठून आणणार? राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना गिरीश महाजन म्हणाले, “यंदा पावसाने सुरुवातीला महिनाभर ओढ दिली आणि आता पुन्हा 35 ते 40 दिवस पावसाचा खंड पडला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उभी पिके करपली असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेक धरणे आणि नद्या कोरड्या पडल्याने भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.” “हवामान खात्याने पुढील एक-दोन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. धरणे भरावीत आणि किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी आम्ही सर्वजण गणरायाला साकडे घालत आहोत. पिकांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास सरकार समर्थ आहे. धान्य गोदामांमध्ये उपलब्ध आहे, मात्र पाण्याचे दुर्भिक्ष कसे भरून काढायचे, ही खरी चिंता आहे.” कोरोनात घरात बसणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये; पंचनाम्यांवरून ठाकरेंना प्रत्युत्तर ५ ऑक्टोबरनंतर एनडीआरएफच्या निकषांनुसार पंचनामे करण्याच्या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांनी “मुहूर्त पाहून पंचनामे करणार का?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर पलटवार करताना महाजन म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी आम्हाला मुहूर्त विचारू नये. त्यांच्या कार्यकाळात जेव्हा राज्यावर कोरोनाचे भीषण संकट आले होते, तेव्हा ते घराबाहेरही पडले नाहीत. शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिली आहे.” “आम्ही शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले, मोफत कृषी सौर पंप दिले आणि तिसऱ्यांदा कर्जमाफीचा लाभ दिला. लाखो कोटींचे नदीजोड प्रकल्प, नार-पार, दमणगंगा तसेच विदर्भातील एक लाख कोटींचा वैनगंगा-नळगंगा प्रकल्प मार्गी लावून समुद्राला वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात आणण्याचे काम महायुती सरकार करत आहे.” राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचे स्वागत करत, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोपीनाथ मुंडेंच्या नावावरून लक्ष विचलित करण्याचा डाव दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूविषयी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या संशयावर महाजन यांनी तीव्र आक्षेप घेतला. “गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबाबत खुद्द मुंडे कुटुंबीय किंवा पंकजाताई मुंडे यांच्या मनात कसलीही शंका नाही. सध्या सुरू असलेल्या दिशा सालियन आणि इतर प्रकरणांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच ठाकरे अशी भडक आणि निराधार वक्तव्ये करत आहेत.” राहुल गांधी आणि संजय राऊत यांची एकच रास निवडणूक आयोग आणि भाजप पक्ष फोडत असल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांचा समाचार घेताना ते म्हणाले, “राहुल गांधी आणि संजय राऊत या दोघांची रास एकच असल्याने ते काहीही वक्तव्ये करू शकतात. काँग्रेसचा जनाधार पूर्णपणे संपला असून देशातील राज्यांतून ते हद्दपार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देश आणि जगात कोणताही पर्याय नाही, हे जनतेला पक्के ठाऊक आहे.” दिशा सालियन प्रकरण: सत्य लवकरच समोर येईल दिशा सालियन यांच्या वडिलांकडून आदित्य ठाकरे यांना मानहानीची नोटीस बजावण्यासाठी ‘मातोश्री’वर जाण्याच्या चर्चेवर विचारले असता महाजन म्हणाले, “या प्रकरणाची मला सविस्तर कल्पना नाही. मात्र, या प्रकरणात जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती तपास यंत्रणा करत आहेत. सुरू असलेल्या चौकशीतून जे सत्य असेल ते निश्चितच जनतेसमोर येईल.” ———————— हेही वाचा… कणकवलीतले खून पचवण्यासाठी यांना सत्ता हवी!: दिशा प्रकरणात ठाकरे कुटुंबावर चिखलफेकीसाठी अर्थपुरवठा कोठून होतोय? संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल “दिशा सालियन प्रकरणात केवळ ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून हा घाणेरडा राजकीय खेळ सुरू आहे. अब्रूची भाषा बोलणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आमचीही प्रतिष्ठा आणि मानमर्यादा आहे. कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून आरोप करणाऱ्यांच्या पाठीशी कोणती अदृश्य शक्ती आहे आणि या संपूर्ण प्रकरणासाठी अर्थपुरवठा कुठून केला जातोय, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे,” असा सणसणीत प्रतिहल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी चढवला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
दुष्काळ-पंचनाम्यांवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार:म्हणाले- कोरोना काळात घराबाहेर न पडलेल्यांनी आम्हाला शिकवू नये; धान्य गोदामात, पण पाणी कुठून आणायचं?