![]()
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे यांनी म्हटले आहे की, महानुभाव साहित्यातून आपल्याला मूल्यात्मक शिकवण आणि नैतिक आचरण मिळते. त्यामुळे या साहित्याचे चांगल्या प्रकारे जतन करणे ही सर्व मराठी भाषिकांची सामूहिक जबाबदारी आहे. मोर्शी येथील परशुराम पॅलेसमध्ये तिसऱ्या महानुभाव साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासनाचे प्रमुख डॉ. महंत सोनपेठकर, रिद्धपूर मराठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावकर, भारतीय विद्या मंदिरच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, न्यायमूर्ती डॉ. कीर्ती कुळकर्णी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. भैय्यासाहेब मेटकर, भारतीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष आगरकर आणि कंवरनगर येथील महानुभाव आश्रमचे विश्वस्त सुभाष पावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी यावेळी खंत व्यक्त केली की, आजचा माणूस दोन प्रतिमांमध्ये जगत असल्यामुळे साहित्यातून समाज निर्मिती होत नाहीये. उद्घाटन सत्रात डॉ. अविनाश आवलगावकर, डॉ. आराधना वैद्य आणि न्यायमूर्ती कीर्ती कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. संतोष आगरकर यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले, तर डॉ. संदीप जुनघरे यांनी सूत्रसंचालन केले. या साहित्य संमेलनात कविसंमेलनाने रंगत आणली. हर्षीकर बाबा शेवलीकर आणि विजयराज पंजाबी यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. या संमेलनाचे आयोजन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, मोर्शीचे भारतीय महाविद्यालय, श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव समिती, विदर्भ साहित्य संघ रिद्धपूर आणि महानुभाव अध्यासन केंद्र अमरावती यांनी मिळून केले होते. संमेलनात भारतीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, महानुभाव पंथाचे नागरिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारच्या सत्रात ‘महानुभाव पंथाचे वर्तमानकालीन सृजनात्मक साहित्य’ या विषयावर परिसंवाद झाला. गोपीराज बाबा शास्त्री अध्यक्षस्थानी होते, तर डॉ. भारतभूषणशास्त्री जामोदेकर, डॉ. अण्णा वैद्य आणि प्रा. चक्रधर कोठी यांनी आपले विचार मांडले. डॉ. अर्चना शिरस्कार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी साहित्यप्रेमींनी महानुभाव पंथाच्या साहित्याची ग्रंथदिंडी काढली. श्रीकृष्ण मंदिरापासून परशुराम पॅलेस या संमेलन स्थळापर्यंत ही ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. यात महानुभाव साहित्याची ग्रंथसंपदा, पुस्तके, वार्षिकांक आणि विशेषांक यांचा समावेश होता.
Source link
महानुभाव साहित्याचे जतन करणे हे मराठी भाषिकांचे कर्तव्य:मोर्शीतील तिसऱ्या साहित्य संमेलनात प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे यांचे मत