Headlines

संघर्ष करा म्हणणाऱ्यांनाच सवाल; नवनीत राणांची पोस्ट चर्चेत:सोबत आहात तर संघर्ष कशासाठी? भाजपमधील नाराजी उफाळली?




अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केल्यानंतरही त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांसाठी सक्रिय प्रचार केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षातील अंतर्गत मतभेद, राज्यसभेची संधी न मिळाल्याची खंत या मुद्द्यांवर त्यांनी थेट भाष्य केले नसले तरी त्यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टमधून नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. नवनीत राणा यांनी अलीकडेच शेअर केलेल्या एका ‘रील’मुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये थेट कोणाचे नाव न घेता सूचक शब्दांत आपले मनोगत मांडले आहे. तुम्ही संघर्ष करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे वाक्य लोक वारंवार वापरतात, मात्र त्यातील वास्तव वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले. या वाक्याचा उल्लेख करत त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनातील दुटप्पीपणावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी हिंदी भाषेत एक विचार मांडला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. लोग कहते हैं, आप संघर्ष करो, हम आपके साथ हैं, लेकिन अगर आप साथ हैं, तो यह संघर्ष क्यों? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या विधानातून त्यांनी समर्थन देण्याच्या नावाखाली प्रत्यक्ष मदत न करणाऱ्या प्रवृत्तीवर निशाणा साधल्याचे दिसून येते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी वेगवेगळ्या अर्थांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यापूर्वीही नवनीत राणा यांनी समाज माध्यमांवरून आपली भूमिका व्यक्त केली होती. संघर्ष करणे माझ्यासाठी नवीन नाही, मी कोणत्याही टप्प्यावरून नव्याने सुरुवात करू शकते, असे त्यांनी एका पोस्टमध्ये नमूद केले होते. या विधानातून त्यांनी भविष्यातील राजकीय संघर्षासाठी तयार असल्याचा संदेश दिला होता. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, नवनीत राणा यांच्या काही वक्तव्यांमुळे यापूर्वीही वाद निर्माण झाले होते. त्यांच्या कडव्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. परतवाडा येथील प्रकरणावर केलेल्या भाष्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यासह डॉ. अनिल बोंडे यांना फटकारले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोस्टमधून काहीतरी वेगळा संदेश एकूणच, नवनीत राणा यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टमधून व्यक्त होणारी नाराजी आणि सूचक संदेश यामुळे त्यांच्या पुढील निर्णयांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्या थेट भाष्य टाळत असल्या, तरी त्यांच्या प्रत्येक पोस्टमधून काहीतरी वेगळा संदेश दिला जात असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे येत्या काळात त्या कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *