Headlines

धर्माचे अधिष्ठान गतिमान करण्यासाठी संतांची परंपरा महान- तुकाराम महाराज:वै. श्रीराम महाराज कीर्तन महोत्सव; भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ‎




वारकरी संप्रदायाला विकसित करून धर्माचे अधिष्ठान गतिमान करण्यासाठी अवतरित झालेल्या संतांची देशात मोठी परंपरा आहे. या परंपरेतील वै. संत श्रीराम महाराज यांचा शताब्दी कीर्तन सोहळा या पवित्र भूमीत होत असून ही भूमी सर्वार्थाने पवित्र क्षेत्र आहे. समोरच्या नदीमुळे हे तीर्थ आहे. स्वयंभू महादेव मंदिरामुळे हा परिसर तीर्थक्षेत्र झाला आहे. या पवित्र जागेवर महाराजांचा शताब्दी कीर्तन सोहळा होणे म्हणजे या भूमीला पावन करणे होय. राज्यभरातील संत, महात्मे, कीर्तनकार या सात दिवशीय कीर्तन महोत्सवात उपस्थित झाले. त्यांनी वारकरी संप्रदायाची पताका गतिमान केली. ही विदर्भाची मोठी उपलब्धी असल्याचे तुकाराम महाराज सखारामपूरकर म्हणाले. ते वै. श्रीगुरू श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात बोलत होते. निंबा फाटा परिसरातील अंत्री मलकापूर येथे राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. यात तुकाराम महाराज यांनी काल्याचे कीर्तन सादर करीत महोत्सवाची सांगता केली. ते म्हणाले, या सात दिवशीय सोहळ्यात जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आदिशक्ती मुक्ताबाई संस्था, राज्यभरातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, कीर्तनकार यांनी आपली उपस्थिती दर्शवली. काल्याच्या कीर्तनाचा उहापोह करताना त्यांनी तुकोबांच्या “कंठी धरीला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णव निका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिकां, उत्तम लोका दाखवूं, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीर गाढे” या अभंगाची साथ-संगत केली. सर्वप्रथम कीर्तनकार व संतांच्या उपस्थितीत तुकाराम महाराज सखारामपूरकर यांचे स्वागत करण्यात आले. या काल्याच्या कीर्तनाच्या समाप्तीनंतर आयोजित महाप्रसादाचा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी लाभ घेतला. त्यांनी उत्सवाचे कौतुक केले. या सात दिवशीय राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाच्या सफलतेसाठी आयोजन समिती, पंचक्रोशीतील महिला, पुरुष, स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. सोहळ्यांमुळे होतो वारकरी संप्रदाय अधिक गतिमान : कीर्तन महोत्सवासारख्या सोहळ्यामुळे धर्म, समाज, संस्था वृद्धिगत होतील. वारकरी संप्रदाय अधिक जोमाने गतिमान होईल. असा विश्वास त्यांनी या काला कीर्तनात व्यक्त केला. दरम्यान रात्री कीर्तन उत्सवात गोपाल महाराज उरळकर यांनी कीर्तन महोत्सवाचे अंतिम कीर्तन सादर केले. या कीर्तनात संतांची महिमा, संतांचे महत्त्व समाजासाठी किती हितावह व सुखकर आहे याची त्यांनी सुंदर मीमांसा केली. समाजाच्या सुदृढ मानसिक व आध्यात्मिक अधिष्ठानासाठी कीर्तन व सत्संग सोहळ्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी आपल्या कीर्तनात सांगितले. तुकाराम महाराज सखारामपूरकर यांनी संतांची महती विशद केली. ते भगवंताचे वेगळ्या पद्धतीने स्मरण करत असतात. आपण राम तर आम्ही वानर. आपण कृष्ण तर आम्ही गोपिका. आपण विटेवरी उभे तर आम्ही वारकरी. अशा प्रकारचे स्मरण संत सातत्याने करीत असतात. भगवंत व संतांच्या या मनोमिलनामुळे साक्षात मृत्यूही संतांना त्यांच्या आदेशाशिवाय शिवू शकत नाही, असे हभप तुकाराम महाराज यांनी श्रीराम महाराजांचा दृष्टांत देऊन सांगितले. गजानन महाराज संस्थानच्या गाडीने महाराज इलोऱ्याला आले असता तेथे यमदूत महाराजांसमोर उपस्थित झाले. त्यांनी त्यांना चालण्याची आज्ञा दिली. मात्र महाराजांनी ही आज्ञा साफ नाकारली. धर्माचे काम पूर्ण झाल्यावरच आपण आपल्या सोबत येऊ, असे यमदूतांना उत्तर दिले. आपण वैकुंठात न जाता पुन्हा या पृथ्वीतलावर अवतरित होऊन संत परंपरा समृद्ध करण्याचा प्रयत्न करू, अशी मनीषा त्यांनी व्यक्त केली होती. अशा संतांच्या जगत-कल्याणाची देशात मोठी परंपरा आहे. ही परंपरा सर्वांनी जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सातत्याने असे सोहळे घेणे ही काळाची गरज आहे, असेही तुकाराम महाराज सखारामपूरकर म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *