![]()
राज्यातील सर्व शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर तपासणीसंदर्भात सविस्तर आणि कडक निर्देश जारी केले आहे, अशी माहिती राज्यमंत्री (शालेय विभाग) डॉ. पंकज भोयर यांनी दिली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून शाळा इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृहे आणि स्वच्छतागृहांची नियमित तपासणी व देखभाल करण्यावर शासनाने विशेष भर दिला असल्याचे त्यांनी सांगतिले. दरवर्षी पावसाळ्याच्या काळात इमारतींची पडझड, गळती, विजेचे अपघात, तसेच अस्वच्छतेमुळे उद्भवणा-या आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात घेऊन यंदा शासनाने अधिक काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. समग्र शिक्षण अभियानांतर्गत या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून सर्व शाळांनी याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मान्सूनपूर्व तपासणीवर भर पावसाळा सुरू होण्यापूर्वी शाळांच्या सर्व इमारतींची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये इमारतींमध्ये पडलेल्या भेगा, सैल प्लास्टर, गळती होणारी छते, कमकुवत भिंती यांची तात्काळ दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. विशेषतः जुन्या आणि जीर्ण इमारतींकडे अधिक लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले. वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरणार नाही याची खात्री करून खिडक्या, दरवाजे, छत आणि मजले यांची तपासणी करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी साचू नये यासाठी शाळेच्या परिसरातील निचरा व्यवस्था, गटारे आणि पाईपलाईन्स स्वच्छ व सुरळीत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वयंपाकगृह व स्वच्छतागृहांची सुरक्षितता शालेय पोषण आहार (मिड-डे मील) तयार होणाऱ्या स्वयंपाकगृहांची सुरक्षितता आणि स्वच्छता ही देखील अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे शासनाने नमूद केले आहे. स्वयंपाकगृहातील छत, धुराडी, गॅस जोडणी, तसेच इंधन साठवण व्यवस्था सुरक्षित आहे का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांच्या बाबतीत पाणीपुरवठा, निचरा व्यवस्था, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्युत व पर्यावरणीय धोके टाळण्याचे आदेश पावसाळ्यात विजेच्या अपघातांचा धोका लक्षात घेता शाळांमधील विद्युत यंत्रणेची तपासणी करावी. उघडी वायरिंग, खराब स्विचेस किंवा शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असलेले भाग तात्काळ दुरुस्त करणे बंधनकारक आहे. तसेच शाळा परिसरातील मोठी झाडे, सुकलेल्या किंवा कमकुवत फांद्या यांची छाटणी करून संभाव्य अपघात टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याचे साचलेले खड्डे किंवा डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करण्यावरही भर देण्यात आला आहे. मान्सून काळातील सतर्कता आवश्यक मुसळधार पावसाच्या काळात धोकादायक किंवा जीर्ण इमारतींचा वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक असल्यास वर्ग बंद ठेवणे किंवा पर्यायी व्यवस्था करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य व शिक्षणावर लक्ष पावसाळ्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये पसरणा-या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांबाबत जनजागृती करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पावसामुळे शैक्षणिक कामकाजात व्यत्यय आल्यास पूरक अध्यापन (रिमेडियल क्लासेस) आयोजित करून अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. अहवाल सादरीकरण व जबाबदारी निश्चित प्रत्येक शाळेने मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर तपासणीचा सविस्तर अहवाल तयार करून संबंधित शिक्षण अधिका-यांना सादर करणे बंधनकारक आहे. धोकादायक इमारतींबाबत तात्काळ उपाययोजना करून आवश्यक निधीची मागणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित अधिका-यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिला. राज्यातील सर्व शाळांनी, स्थानिक स्वराज्य संस्था, पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी केले.
Source link
राज्यातील शाळांच्या मान्सूनपूर्व तपासणीसाठी शासन सतर्क:छते, भिंती आणि निचरा व्यवस्था व्यवस्थित करा- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर