![]()
‘सैराट’ चित्रपटामध्ये परश्याचा जिगरी मित्र ‘सल्या’ (सलीम) ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरा जात आहे. अरबाजने आज (९ जुलै) पहाटे ४ वाजताच्या सुमारास आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अत्यंत भावूक व्हिडिओ पोस्ट करत वडिलांच्या उपचारासाठी मदतीची आर्त हाक दिली. “मला माझ्या बापाला मरू द्यायचं नाहीये, प्लीज मदत करा,” असे म्हणत ओक्साबोक्सी रडणाऱ्या अरबाजच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवून दिली. मात्र, या व्हिडिओची चौफेर चर्चा सुरू झाल्यानंतर आणि प्रशासकीय वर्तुळ हलल्यानंतर अरबाजने आता हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून डिलीट केला आहे. वडिलांना ब्रेन हॅमरेज, उपचारासाठी सोलापूरला शिफ्ट मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज शेखचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे सुरुवातीला त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर त्यांच्या हृदयाचा त्रास वाढल्याने त्यांना तातडीने सोलापूर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु, या रुग्णालयात आल्यानंतर अरबाजला अत्यंत वाईट आणि धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले, ज्याचा पाढा त्याने आपल्या व्हिडिओमध्ये वाचला होता. “गोळ्यांच्या नावाखाली लूटमार…” अरबाजचा रुग्णालयावर गंभीर आरोप व्हायरल झालेल्या आणि आता डिलीट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अरबाजने रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. तो म्हणाला होता, “आम्ही वडिलांना ॲडमिट केल्यावर सुरुवातीला १० हजार रुपये डिपॉझिट भरले. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे आम्हाला रुग्णालयाच्याच मेडिकलमधून घेण्याची सक्ती करण्यात आली. मी तिथून तीनवेळा औषधं आणली, ज्याचे बिल तब्बल ४० हजार रुपयांच्या वर गेले. धक्कादायक बाब म्हणजे, तीच गोळ्या-औषधं मी जेव्हा बाहेरून चौकशी केली, तेव्हा ती मला अर्ध्या किमतीत म्हणजे केवळ २० हजार रुपयात मिळत होती. ही थेट सर्वसामान्यांची लूट आहे.” व्हिडिओ का केला डिलीट? रुग्णालयाच्या या मनमानी कारभारामुळे आणि पैशांच्या अडचणीमुळे पूर्णपणे खचलेल्या अरबाजने पहाटेच्या वेळी थेट रुग्णालयाबाहेर उभे राहून रडत-रडत हा व्हिडिओ पोस्ट केला होता. “मला आता काहीच सुचत नाहीये, मी माझ्या वडिलांवर कुठे आणि कसे उपचार करू? मला कोणीतरी मार्ग दाखवा, माझ्या बापाला वाचवा,” अशी विनवणी त्याने केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि चाहत्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद वाढल्याचे पाहून किंवा रुग्णालयाकडून या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलण्यात आल्यानंतर, अरबाजने काही तासांतच तो व्हिडिओ आपल्या प्रोफाईलवरून हटवला आहे. व्हिडिओ डिलीट केला असला तरी, महाराष्ट्रातील बड्या खाजगी रुग्णालयांमध्ये औषधोपचाराच्या नावाखाली होणाऱ्या लुटीचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. हेही वाचा.. मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका, अद्याप 6 ते 7 जण अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आज एक मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी दुपारी अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा महाकाय डोंगर शेजारील प्रशासकीय इमारतीवर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकले होते. कालपासून सुरू असलेल्या युद्धपातळीवरील बचावकार्याला आता मोठे यश आले असून, आतापर्यंत एकूण ९ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अद्यापही ६ ते ७ जण या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर वाचा.. राज्यात पावसाचा जोर ओसरला:विदर्भात विश्रांती, तरीही पुणे-साताऱ्यासह 17 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना महत्त्वाचा इशारा गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी, धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील १७ जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा कायम ठेवला असून, यामध्ये २ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर १५ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
Source link
'माझ्या बापाला मरू द्यायचं नाही…':ओक्साबोक्शी रडत 'सैराट' फेम सल्याने मागितली मदत, काही तासांतच डिलीट केला भावनिक व्हिडिओ