![]()
पुण्यात २८ एप्रिल २०२६ रोजी ‘अटक विजय दिवस’ अर्थात ‘मराठा साम्राज्य दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. मराठा योद्ध्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी हा सोहळा शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात सायंकाळी ६:३० ते ९:०० या वेळेत पार पडेल. २८ एप्रिल १७५८ रोजी मराठ्यांनी सिंधू नदीच्या तीरावरील ‘अटक’ किल्ला जिंकून मराठा साम्राज्याचा भगवा झेंडा अटकेपार फडकवला होता. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी पुणे महानगरपालिका, बायोस्फिअर्स संस्था, दख्खन इतिहास संशोधन संस्था आणि अटकवीर मानाजी पायगुडे सभा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ‘स्वराज्य ते साम्राज्य: मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची शौर्यगाथा’ ही सांगीतिक मानवंदना असेल. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार उदय रामदास व त्यांचे सहकारी संगीताच्या माध्यमातून मराठ्यांचा पराक्रम सादर करतील. याव्यतिरिक्त, डॉ. सचिन पुणेकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘अटकेपार झेंडा मोहीम’ विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन डाक विभागाच्या वतीने केले जाईल. इतिहासप्रेमींसाठी संतोष चंदने यांच्या संग्रहातील ‘शिवशस्त्रगाथा’ या ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन हे विशेष आकर्षण असेल. कार्यक्रमाची सुरुवात केशव शंखनाद पथकाच्या विश्वविक्रमी शंखनादाने होईल. लघुपट आणि पारंपरिक वाद्यवंदना यांसारख्या विविध कार्यक्रमांची मेजवानीही पुणेकरांना मिळेल. या कार्यक्रमाला हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य उभारणीत योगदान देणाऱ्या सरदार घराण्यांचे आणि मावळ्यांचे वारसदार प्रतिनिधी, संत, अभ्यासक, साहित्यिक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. पुणे हे मराठा साम्राज्याचे सत्ताकेंद्र असल्याने शनिवारवाड्यासमोर हा सोहळा आयोजित करणे योग्य ठरेल. आयोजकांनी सर्व शिव-शंभूप्रेमींना या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Source link
शनिवारवाड्यासमोर 'अटक विजय दिवस' साजरा होणार:मराठ्यांच्या इतिहासाला सांगीतिक मानवंदना, 28 एप्रिल रोजी कार्यक्रम