![]()
आधुनिकता आणि पारंपरिकतेचा संगम साधणारा सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचा शारदीय दुर्गापूजा महोत्सव १६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान बालेवाडी हायस्ट्रीट येथील साफा बँक्वेट्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून, यंदा ‘मानुषेर माझे माँ’ अर्थात ‘माणसांमध्ये आई’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. या माध्यमातून माणुसकी, कृतज्ञता आणि पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे. सप्तपदी असोसिएशनचे अध्यक्ष संजय बिस्वास यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. देवीचे अस्तित्व केवळ धार्मिक विधींमध्ये नव्हे, तर इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या माणसांच्या श्रमांत आणि समर्पणातही अनुभवता येते, हा यंदाच्या संकल्पनेचा मुख्य संदेश आहे. मूर्तिकार, मंडप उभारणारे कारागीर, ढाक वादक, रोषणाई करणारे तंत्रज्ञ, फुलविक्रेते, सुरक्षारक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या योगदानाला यंदा विशेष महत्त्व दिले जाणार आहे. महोत्सवात पर्यावरणपूरक दुर्गामूर्ती हे प्रमुख आकर्षण असेल. स्थानिक कारागिरांनी अनेक महिन्यांच्या मेहनतीतून देवीसाठी हाताने तयार केलेले दागिनेही विशेष लक्ष वेधतील. धार्मिक विधींसोबत बंगाली खाद्य महोत्सव, भक्तिसंगीत, नृत्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन आणि खाद्यपदार्थांचे दालन यांची मेजवानी भाविकांना अनुभवता येईल. १६ ऑक्टोबरला महाषष्ठीच्या पूजेने महोत्सवाला प्रारंभ होईल. १७ ऑक्टोबरला महासप्तमी, १८ ऑक्टोबरला महाष्टमी आणि १९ ऑक्टोबरला महानवमीचे विधी होतील. २० ऑक्टोबरला कुमारी पूजा आयोजित करण्यात येणार आहे. दररोज सकाळी पूजाविधी, पुष्पांजली आणि दुपारी १२ वाजल्यापासून महाप्रसादाचे वाटप होईल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम रंगतील. महोत्सवासाठी वातानुकूलित सभागृह, वाहनतळाची सुविधा, मोफत आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी व्हीलचेअर तसेच चोवीस तास वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे.
Source link
बालेवाडीत ‘मानुषेर माझे माँ’ संकल्पनेतून दुर्गापूजा महोत्सव:16 ते 21 ऑक्टोबरदरम्यान, माणुसकीचा संदेश; बंगाली खाद्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी