![]()
एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता पोलिसांच्या कारवाईचेही वळण मिळाले आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनाचे विनापरवाना ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे ड्रोन आणि रिमोट कंट्रोलर जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एस. एम. जोशी पुलाजवळ, पत्रकार भवनाशेजारी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करीत असताना गर्दीवर ड्रोन उडविले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी ड्रोन चालविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. आंदोलनस्थळामागील जनरेटरजवळ ड्रोन चालविणारी व्यक्ती आढळली. त्याची ओळख दिगंबर भारत खाडे (वय ३५, रा. आंबेगाव, पुणे) अशी पटली. तो छायाचित्रकार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ड्रोन उडविण्यासाठी तसेच आंदोलनाचे चित्रीकरण करण्यासाठी आवश्यक परवानगी किंवा परवाना मागितला असता तो सादर करता आला नसल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान खाडे याने प्रमोद पाटील, शिवराज मोरे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्या सांगण्यावरून ड्रोन उडविल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. त्यानुसार या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत सुमारे ४० हजार रुपये किमतीचा राखाडी रंगाचा ड्रोन कॅमेरा आणि १० हजार रुपये किमतीचे रिमोट कंट्रोलर जप्त करण्यात आले. पोलिस हवालदार युवराज भारत टेले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असल्याने आंदोलनाभोवतीचे वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत.
Source link
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोरेंसह पाच जणांवर गुन्हा:एमपीएससी आंदोलनात विनापरवाना ड्रोन उडवल्याने; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा, 50 हजारांचे साहित्य जप्त