Headlines

केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावर आमदार कैलास पाटलांची टीका:म्हणाले- यांचा दौरा म्हणजे इव्हेंट; प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये- खासदार निंबाळकर




राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, या दौऱ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केंद्रीय पथकाच्या पाहणीवर टीका करत, सरकारला केवळ इव्हेंट करण्याची सवय लागल्याचा आरोप केला. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये, असा सल्ला दिला. धाराशिवमधील येडशी परिसरात केंद्रीय पथकासोबत पाहणी केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपापल्या भूमिका मांडल्या. माध्यमांशी बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी झाली असून ई-पिक पाहणी आई पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय पथक पाहणी दौऱ्याची गरज काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर प्रत्यक्ष मदत मिळणे महत्त्वाचे असताना केवळ पाहणी आणि दौऱ्यांवर भर दिला जात आहे. शेतीचे पूर्ण नुकसान झाले, पाहणी झाली, ई-पिक पाहणी झाली; आता फक्त इव्हेंट सुरू आहेत, अशी टीका पाटील यांनी केली आहे. गुजरातला लगेच मदत मिळते, महाराष्ट्राला का नाही? कैलास पाटील यांनी गुजरातमधील नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीचा दाखला देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत देण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुजरातमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास पाहणी किंवा पंचनाम्यांची प्रतीक्षा न करता मदत दिली जाते, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विलंब का केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये- ओमराजे निंबाळकर कैलास पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, दुष्काळात सत्ताधारी किंवा विरोधक असं पाहू नये, केंद्रीय पथक पाहणी करून गेले ही पद्धत आहे. अहवाल गेल्यानंतर मदत मिळेल. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. दुष्काळात सत्ताधारी विरोधक असे न पाहता शेतकऱ्याचे हित सगळ्यांनी पाहावे. केंद्रीय पथक दुष्काळात पाहणीसाठी येते. त्यांचा अहवाल गेल्यानंतर मदत मिळायला सोपे जाईल. केंद्रीय पथक वेळेवर आल्याचे देखील निंबाळकर म्हणाले. सरकारच्या निर्णयाकडे लक्ष दरम्यान, केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावरून आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर टीका केली, तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतीच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर सरकार मदतीबाबत काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *