Headlines

Rohit Pawar Questions Pune Police Over PG Hostel Notices


“एमपीएससीमधील (MPSC) मूळ भ्रष्टाचारी चोराला जोपर्यंत गजाआड केले जात नाही, तोपर्यंत परीक्षा देऊन काहीही साध्य होणार नाही; केवळ पैशांचे व्यवहार आणि दलालांचे खिसे भरणेच चालू राहील. म्हणूनच आयोगाच्या वादग्रस्त अध्यक्षांची हकालपट्टी होईपर्यंत हे आंदोलन सु

.

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या आंदोलनाचा विस्तार आता 3 हजार विद्यार्थ्यांवरून तब्बल 50 हजारांच्या वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी विश्रामबाग पोलिसांनी दाखल केलेले एकामागोमाग एक दोन एफआयआर, विद्यार्थ्यांची होणारी धरपकड आणि प्रशासकीय दडपशाहीवरून सरकारची कठोर शब्दांत पोलखोल केली.

भाषण मी केले मग विद्यार्थ्यांवर FIR का?; माझे नाव टाकायला भीती वाटते का?

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरमधील विसंगतींवर बोट ठेवत रोहित पवार म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून 1 तारखेला संध्याकाळी आम्ही एस. एम. जोशी पुलावर बसण्याचा निर्णय घेतला. या पुलाच्या दोन्ही बाजूला स्मशानभूमी आहे, तिथे शाळा किंवा रुग्णालये नाहीत, वर्दळ कमी असते. शिवाय २ तारखेची आम्हाला रीतसर परवानगी होती.”

खोटे गुन्हे आणि नावे

“पोलिसांनी एफआयआरमध्ये ज्या 14-15 जणांची नावे टाकली आहेत, त्यांपैकी चार जण त्या दिवशी पुण्यात किंवा आंदोलनस्थळी नव्हतेच; ते दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी गावातून आले. पोलिसांनी अंधपणे एफआयआर नोंदवला असून, त्यामध्ये मुला-मुलींच्या लिंगाचीही चुकीची नोंद केली आहे. एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने पत्रकाराला मारहाण केली, त्याला कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले; पण त्याचेही नाव एफआयआरमध्ये टाकून आंदोलक म्हणून दाखवले गेले.”

माझ्यावर कारवाई का नाही?

“मी तिथे उपस्थित होतो, मी भाषण केले आणि आंदोलनाचा निर्णय झाला. मी पोलिसांना स्पष्ट विचारले की, माझे नाव एफआयआरमध्ये का नाही? तर पोलीस म्हणतात ‘तपास चालू आहे’. बड्या नेत्यांवर एफआयआर करताना तुम्हाला आधी तपास करावा लागतो, आणि निष्पाप गरीब विद्यार्थ्यांवर मात्र एका रात्रीत गुन्हे नोंदवता? हिंमत असेल तर विद्यार्थ्यांवर हात टाकण्याऐवजी मला अटक करा,” असे आव्हान रोहित पवारांनी दिले.

विद्यार्थी म्हणजे आतंकवादी किंवा नक्षलवादी आहेत का?; PG आणि हॉस्टेलला मध्यरात्री नोटिसा

पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईची त्यांनी धक्कादायक माहिती दिली, “काल मध्यरात्री 1 ते 2च्या सुमारास पुणे पोलिसांनी नवी पेठ, सदाशिव पेठ आणि परिसरातील खासगी वसतिगृहे व पीजी (PG) चालकांना नोटिसा बजावल्या. त्या नोटीसमध्ये लिहिले आहे की, ‘दहशतवादी कारवाया करणारे, आंतरराष्ट्रीय किंवा परराज्यातील गुन्हेगार लपले आहेत का याची माहिती द्या.’ विद्यार्थ्यांचे व्हिडियो आमच्याकडे आले आहेत; पोलीस त्यांना ‘आंदोलनाला का जाता, तिथे गर्दी का करता’ अशा धमक्या देत आहेत.”

रॉकेट आणि दगडांचे खोटे आरोप

“1 तारखेच्या एफआयआरमध्ये पोलिसांनी चक्क एका कलमाखाली ‘विद्यार्थ्यांकडे रॉकेट्स आणि दगड होते’ असा विचित्र व धादांत खोटा उल्लेख केला आहे. अभ्यासू, सुशिक्षित तरुणांना आतंकवादी आणि नक्षलवादी ठरवण्याचा हा प्रयत्न अत्यंत घृणास्पद आणि अन्यायकारक आहे.”

मित्राला वाचवण्यासाठी थेट आयुक्तांवर दबाव!

पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट ताशेरे ओढताना रोहित पवार म्हणाले, “पुणे शहराची कायदा-सुव्यवस्था सांभाळणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी एकतर पूर्णपणे आंधळे झाले आहेत किंवा त्यांना काही समजत नाही. या अधिकाऱ्यांवर थेट मंत्रालयातून आणि गृहखात्याकडून दबाव आहे. मुख्यमंत्र्यांचे मित्र असणाऱ्या एमपीएससी अध्यक्षांना वाचवायचे आहे, म्हणून पोलीस आयुक्तांवर आणि तिथून स्थानिक पोलिसांवर आंदोलकांचा छळ करण्यासाठी दबाव टाकला जात आहे.”

संयम सुटल्यास सरकारला भोवेल

“विद्यार्थी आता मोबाईलवर दिल्लीतील आणि देशातील घडामोडी पाहत आहेत. संविधानाच्या रक्षणासाठी आणि न्याय हक्कांसाठी तरुण रस्त्यावर उतरला आहे. पोलिसांनी एका जरी विद्यार्थ्यावर अतिरिक्त आकस ठेवून कारवाई केली, तर हा लढा कोणाच्याही नियंत्रणात राहणार नाही. जर तरुणांचा संयम सुटला, तर हे या सरकारच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही.”

संख्या 3 हजारांवरून 50 हजारांवर; आंदोलन पूर्णपणे शांततेत!

आंदोलन हिंसक न होता शांततापूर्ण मार्गाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांनी सद्यस्थिती मांडली. “आम्ही आक्रमक न होता शांततेने लढत आहोत. हे आंदोलन सुरू झाले तेव्हा ३ हजार मुले होती, नंतर ती संख्या ३० हजारांवर गेली आणि आज ५० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी रस्त्यावर ठाण मांडून आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुले येत आहेत.”

मार्गदर्शन, कवी संमेलन आणि विद्यार्थी संसद

“आंदोलनाच्या मंचावर आम्ही निवृत्त आयएएस (IAS) अधिकाऱ्यांना बोलावून प्रशासकीय सुधारणांवर मार्गदर्शन ठेवले आहे. कवी, साहित्यिक येत आहेत. विद्यार्थ्यांनी मंचावर ‘विद्यार्थी संसद’ चालवून ग्रामीण शेतकरी कुटुंबांचे आणि स्पर्धा परीक्षांचे प्रश्न मांडले आहेत. आमचे आंदोलन पूर्णपणे अभ्यासू आणि लोकशाही मार्गाने सुरू असून, जोपर्यंत अध्यक्षांचा राजीनामा घेतला जात नाही आणि परीक्षा पद्धत पारदर्शक होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” असा पुनरुच्चार रोहित पवार यांनी केला.

———————————————-

हेही वाचा…

पुण्यात MPSC आंदोलकांवर दुसरा गुन्हा दाखल : विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या शिवराज मोरेंसह 5 जणांवर बडगा

पुण्यातील अलका टॉकीज चौक आणि एस. एम. जोशी पुलावर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनावरून पोलीस प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमधील संघर्ष आता अधिक तीव्र बनला आहे. आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आता दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ताज्या कारवाईत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह 5 जणांना आरोपी करण्यात आले आहे. यापूर्वीच रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी 15 प्रमुख आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते; त्यात आता ड्रोन प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्याची भर पडल्याने राजकीय व विद्यार्थी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.