Headlines

संतोष देशमुख हत्या प्रकरण:आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज फेटाळला; सर्व पुरव्यांच्या विचारांती उच्च न्यायालयाचा निर्णय




बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपी विष्णू चाटे याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात चाटेचा सहभाग असल्याचे दर्शवणारे पुरावे तपास यंत्रणेने न्यायालयात सादर केले. यामध्ये कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक व्हॉइस सॅम्पलचा समावेश आहे. या पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने जामीन नाकारला. आता विष्णू चाटे याला एका वर्षानंतर नव्याने जामिनासाठी अर्ज करता येणार आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्यासह आरोपींची नावे समोर आली. तपासानुसार, संतोष देशमुख यांना टाकळी शिवारातील सुदर्शन घुले याच्या शेतात नेण्यात आले. तेथे त्यांना लोखंडी रॉड आणि गॅस पाईपने अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. व्हिडिओ कॉलमुळे प्रकरणाला गंभीर वळण हत्येच्या वेळी आरोपींनी परळीतील वाल्मीक कराड याला व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप तपासात समोर आला. या कॉलद्वारे हत्येचा प्रकार दाखवण्यात आल्याचे वृत्त आहे. वाल्मीक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. या आरोपांमुळे प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले. मकोकाअंतर्गत कारवाई, दोषारोपपत्र दाखल हत्याकांडानंतर पोलिसांनी या प्रकरणात मकोकाअंतर्गत कारवाई केली. तपास यंत्रणेने न्यायालयात तब्बल 1,800 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील आरोपींची भूमिका, त्यांच्यातील संपर्क आणि गुन्ह्याशी संबंधित पुरावे तपासाचा महत्त्वाचा भाग ठरले आहेत. मोबाईलमधून व्हिडिओ आणि फोटो जप्त तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईल फोनमधून हत्येशी संबंधित 15 व्हिडिओ आणि 8 फोटो मिळाल्याचे वृत्त आहे. या दृश्यांमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण होत असल्याचे तसेच आरोपी आनंद साजरा करत असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पुराव्यांच्या आधारे जामीन नाकारला विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेने सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक व्हॉइस सॅम्पलसारखे पुरावे सादर केले. मकोका आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने या पुराव्यांचा विचार करण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चाटे याचा जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयामुळे त्याला आणखी एक वर्ष जामिनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *