![]()
प्रतिनिधी | नाचनवेल धर्माचे व भारतीय संस्कृतीचे पालन करणे गरजेचे आहे, हिंदू संस्कृती टिकवणे संघटन आणि धार्मिक जागृती गरजेची आहे, असे प्रतिपादन डॉ. साध्वी धर्मासिहनी गायत्री यांनी केले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदू संमेलने आणि विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे मंगळवार, २८ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर परिसरात हिंदू धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांची श्रीराम मंदिर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी प्रथम राम मंदिर व हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. शेलगाव येथील शिवाजी भुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केल्यानंतर त्यांची घोड्यावर बसवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. या दृश्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते बाळासाहेब चव्हाण हे होते. विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात टाळ-मृदंग वाजवत व पावली खेळत कार्यक्रमाची व मिरवणुकीची शोभा वाढवली. ठिकठिकाणी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले. कार्यक्रमप्रसंगी प्रथम आलेल्या मुख्य संत-महंतांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आले. याप्रसंगी आलेल्या सर्व संत-महंतांचा सत्कार करण्यात आला. डॉ. साध्वी धर्मासिंहनी गायत्री (दत्त शाबरी आश्रम, अंबड, जिल्हा जालना) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हिंदू संस्कृती टिकवणे संघटन आणि धार्मिक जागृती गरजेची आहे. धर्मशिक्षण कुटुंबाची संरक्षण आणि हिंदू ऐक्यावर भर देण्यात आला. जातपात विसरून हिंदूंनी हिंदू म्हणून संघटित होण्याचे आवाहन केले. या संमेलनामध्ये संत विचारवंत आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला तसेच नाचनवेलसह पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी मोठे सहकार्य केले.
Source link
धर्म व संस्कृतीचे पालन करणे गरजेचे; संघटन, धार्मिक जागृतीची आवश्यकता:संमेलन डॉ. साध्वी धर्मासिहनी गायत्री यांचे नाचनवेल येथे हिंदू संमेलनात प्रतिपादन