![]()
महाराष्ट्र मध्ये १८ ऑक्टोबर १९४८ रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषद भरवली होती. त्या परिषदेत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, दत्तोबा गव्हाणकर यांनी महाराष्ट्राचा पोवाडा सादर केला. महाराष्ट्राचा इतिहास, लोकजीवन, कला ,साहित्य, संस्कृती या सर्व सामाजिक अंगाचा प्रेरणादायी व गौरवशाली ओळख करून देणारा हा पोवाडा होता. अण्णाभाऊ साठे यांचा अभ्यास चिंतन प्रतिभा शक्तीला अमर शेखांच्या तेवढ्याच दमदार पहाडी आवाजाने साथ दिली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा शाहीरांनी गाजवला, अन बार्शीचे सुपुत्र शाहीर अमर शेख ख-या अर्थाने लढ्याचे अमर शिल्पकार ठरले. समाजवादी भारतात समाजवादी संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा, अशी तत्कालीन नेत्यांची इच्छा होती. वर्तमानाप्रमाणे कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न तेंव्हाही केला जात होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील कार्यकर्ते व त्यांच्या लालबावटा कला पथकावर बंदी घातली जात होती. महाराष्ट्रा पासून मुंबई हिरावून घेण्याचा डाव गुजराती धनदांडग्यांकडून सरकारद्वारे टाकला जात होता. महाराष्ट्राची रक्तवाहिनी मुंबई कोणाची हा प्रश्न आता राज्यकर्त्यांचा डावपेचाचा भाग राहिलेला नव्हता तर तो आम मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला होता. शाब्बास शाहीर अशी पाठीवर थाप मारली असती आचार्य अत्रे हे कॉ. अमर शेख बद्दल म्हणतात, “सतत चार चार तास त्याच सप्तकात चढत्या आवाजाने ते गात राहायचे. हा शाहीर सामर्थ्याचा अद्भुत पूर्ण विक्रम आहे; दुसरा कोणी माणूस त्यांच्या जागी असता तर उर फुटून आणि रक्त ओकून रस्त्यात मरून पडला असता. श्री शिवछत्रपती त्या काळी असते, तर त्यांनी अक्षरश: आपल्या छातीवर उचलून धरत, शाब्बास शाहीर अशी थाप मारली असती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढ्याला पाठिंबा लढ्याचे नेतृत्व सर्व पक्षाचे उत्तुंग नेते करत होते. यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. एस. एम. डांगे, कॉ. सरदेसाई, कॉ. क्रांतीसिंह नाना पाटील, समाजवादी साथी एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु लिमये, मधु दंडवते, शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, लाल निशाण पक्षाचे कॉम्रेड दत्ता देशमुख, रिपब्लिकन पक्षाचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड, दादासाहेब रूपवते तर स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सेनापती बापट, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे असे एकापेक्षा एक असे रथी महारथी या लढ्याच्या अग्रभागी होते.
Source link
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत अमर शेख यांचे योगदान:शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर यांनी पोवाड्यातून जागवली प्रेरणा