Headlines

पोलिसांपुढे अपुऱ्या मनुष्यबळाचे आव्हान:कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य- अधीक्षक सुदर्शन‎




जिल्ह्याचा विस्तार मोठा असून येथील गुन्हेगारीचे प्रमाणही जास्त आहे. ५० लाख लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३२०० पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ आणि सततचे व्हीआयपी दौरे व त्यासाठी बंदोबस्त हे पोलिस दलासमोरील मोठे आव्हान असल्याचे मत नूतन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी व्यक्त केले. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ कारवाई करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले. अधीक्षक सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यापुढील आव्हाने आणि आगामी भूमिकेबाबत माहिती दिली. अधीक्षक सुदर्शन म्हणाले की, जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याची स्थिती वेगवेगळी आहे. त्यातच व्हीआयपी दौऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने अपुऱ्या मनुष्यबळातून त्यांनाही बंदोबस्त पुरवावा लागतो. या सर्व आव्हानांना सामोरे जाताना कुठल्या एका विशिष्ट विषयाला प्राधान्य देण्यापेक्षा, घटना घडताच त्वरित ॲक्शन घेण्यावर आपला भर राहील, असे ते म्हणाले. शहरातील सराफ व्यावसायिकांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या मुद्द्यावर बोलताना ज्यांचे दागिने चोरीला गेले आहेत त्यांना न्याय द्यायचा की ज्यांच्याकडून ते हस्तगत केले आहेत त्यांना प्राधान्य द्यायचे? असा सवाल करत सराफ संघटनेच्या तक्रारीची पोलिसांकडून सखोल चौकशी सध्या सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले प्रतिबंधात्मक कारवाईचे अनेक प्रस्ताव सध्या प्रलंबित असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, यावर जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय साधून हे प्रस्ताव लवकरच मार्गी लावले जातील, असेही त्यांनी सांगितले. वाहतूक समस्येवर माहिती घेऊन तोडगा काढला जाईल अहिल्यानगर शहरातील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. वाहतूक शाखेच्या नेमक्या काय अडचणी आहेत आणि मनुष्यबळाचा कसा वापर करता येईल, हे समजून घेऊन शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील, असेही अधीक्षक सुदर्शन यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *