![]()
अहिल्यानगर न्यायाधीशांनी आपल्या कार्यकाळात न्यायदान, शिस्त आणि संवेदनशीलतेचा जो आदर्श निर्माण केलेला असतो, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार सोहळे हे एक उत्तम माध्यम आहे. न्यायाधीश आणि वकील (बार) यांच्यातील सौहार्दाचे संबंध न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहेत, असे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी केले. अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयातून बदली झालेले, नव्याने रुजू झालेले आणि पदोन्नती मिळालेल्या न्यायाधीशांच्या सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास जिल्हा न्यायाधीश आशिष पाटील, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, वकील संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब घुले, खजिनदार ॲड. वसिम खान यांच्यासह ॲड. सुरेश भोर, ॲड. नवनाथ गर्जे, ॲड. स्वाती वाघ व मोठ्या संख्येने वकील मंडळी उपस्थित होती. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे यांनी आपल्या प्रास्ताविकात बदली झालेल्या न्यायाधीशांच्या कार्याचा गौरव केला. “नगरमध्ये या न्यायाधीशांनी उत्कृष्ट न्यायसेवा दिली असून, विशेषतः ज्युनिअर वकिलांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता भालेराव, जिल्हा न्यायाधीश महेश लोणे, जी. एम. शेख, ए. एम. हुसेन, डी. डी. कर्वे, ए. बी. पाटील, एफ. एफ. इराणी यांना निरोप देण्यात आला. तर पदोन्नतीबद्दल जिल्हा न्यायाधीश चावरे आणि आर. डी. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. गौरव दांगट यांनी केले, तर ॲड. प्राजक्ता करांडे यांनी आभार मानले. लोकन्यायालयासाठी सहकार्याचे आवाहन प्रधान न्यायाधीश कचरे यांनी बदली होऊन जाणाऱ्या न्यायाधीशांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतानाच, नवीन ठिकाणीही त्याच ईर्षेने काम करण्याचे आवाहन केले. तसेच, येत्या ९ मे रोजी होणाऱ्या लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायाधीश आणि वकिलांनी असेच सहकार्य ठेवावे, असेही त्यांनी नमूद केले.
Source link
न्यायाधीशांनी न्यायदान, शिस्त, संवेदनशीलतेचा वारसा जपावा:प्रधान जिल्हा न्या. शिवाजी कचरे यांचे आवाहन