.


जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाची ‘लाइफलाइन’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेवर अखेर सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. संचालक मंडळाची मुदत संपूनही निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अकोले तालुक्यातील सीताराम गायकर, अमित भांगरे आणि मधुकरराव नवले या ‘त्रिमूर्ती’सह संपूर्ण संचालक मंडळ पदमुक्त झाले आहेत.
सहकार विभागाने मार्चअखेर निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजवले होते. मात्र, राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा आल्याने या प्रक्रियेला स्थगिती मिळाली. मुदत संपलेल्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने नाशिक विभागीय सहनिबंधक कार्यालयाने प्रशासकाचा आदेश काढला. मंगळवारी जिल्हा विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांनी प्रशासक म्हणून सुत्रे हाती घेतली.
अकोले तालुक्यातून बँकेवर प्रतिनिधित्व करणारे तिन्ही नेते वेगवेगळ्या राजकीय विचारांचे असले तरी सहकारात त्यांची पकड मजबूत होती. मात्र, आता चित्र बदलले आहे. सीताराम गायकर हे प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे. अशावेळी ते आपला राजकीय वारसदार म्हणून कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तरुण नेतृत्व अमित भांगरे यांना मागच्या वेळी थोरात यांच्यामुळे संधी मिळाली होती. आता बदललेल्या राजकीय स्थितीत त्यांना पुन्हा संधी मिळणार का? हा प्रश्न आहे. ज्येष्ठ नेते आणि तज्ज्ञ संचालक म्हणून मधुकरराव नवले यांचा अनुभव मोठा आहे, मात्र महायुतीच्या वाढत्या प्रभावात काँग्रेसच्या गोटातून पुन्हा संधी मिळवणे आव्हानात्मक असेल.
“थोरात-विखे’ संघर्ष पुन्हा पेटणार? जिल्हा बँकेच्या राजकारणात नेहमीच बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते. सध्याचे सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद विखे-पाटील यांच्याकडे असल्याने, आगामी निवडणुकीत ‘विखे फॅक्टर’ वरचढ ठरण्याची शक्यता आहे. अशावेळी अकोल्यातील इच्छुक उमेदवार आतापासूनच दोन्ही गटांशी संधान साधून आहेत.