![]()
अहिल्यानगर अहिल्यानगर शहरात एप्रिल महिन्यात तापमान ४० ते ४२ अंशांपर्यंत पोहोचल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात सातत्याने चढ-उतार होत आहेत. तापमानाचा पारा ३७ ते ३९ अंशांदरम्यान स्थिरावलेला असतानाच, यंदाही मे महिन्यात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. साधारणपणे १५ मे नंतर अपेक्षित असलेला मान्सूनपूर्व पाऊस यंदा नऊ दिवस आधीच हजेरी लावण्याची शक्यता आहे. गुरुवारी शहरात दिवसभर कडक ऊन असताना सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात सहा दिवस पावसाने हजेरी लावली होती. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमान उच्चांकी स्तरावर असताना ५ मेपासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी जमिनीला ओल मिळणार असून, २० मेनंतर ग्रामीण भागात पेरणीपूर्व मशागतींना वेग येईल. मात्र, हा दिलासा अल्पजीवी ठरण्याची शक्यता आहे; कारण ९ मेनंतर तापमानाचा पारा पुन्हा ४० अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जिल्ह्यात १०४ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्टमध्येही मान्सून सक्रिय होता. यंदा एप्रिलमध्ये तापमान ४०-४२ अंशांवर होते, ५ मेपासून त्यात बदल होण्यास सुरुवात झाली. कमी दाबाचा पट्टा: दक्षिण मध्य प्रदेशपासून अंतर्गत तामिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो महाराष्ट्रातून जात आहे. चक्रीय स्थिती: मध्य प्रदेशच्या मध्य भागात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. बाष्पीभवन: एप्रिलमधील उच्चांकी तापमानामुळे जमिनीतील ओलावा बाष्पीभवनाद्वारे हवेत गेला असून, त्याचेच रूपांतर आता पावसाच्या ढगांत झाले आहे. रवी आंधळे, शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पाऊस १५ मे पासून अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज आहे. सध्या सुरू असलेला बेमोसमी पाऊस हा स्थानिक वातावरण बदलामुळे होत आहे. सध्या आर्द्रता कमी असली तरी पुढील तीन दिवसांनंतर तापमान वाढ होणे अपेक्षित आहे.
Source link
यंदा मान्सूनपूर्वच्या नऊ दिवस आधीच बेमोसमीचे दाटले ढग:गेल्या वर्षी मे महिन्यात 104 मिमी बरसला, शहराचा पारा 37 अंशावर