![]()
आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांमध्ये असंवेदनशीलता वाढीस लागली असून मोबाईलचे व्यसन आणि नैतिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यात चांगले संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगीता तत्वज्ञान प्रणालीनुसार सुसंस्कार शिबिरांची गरज असल्याचे प्रतिपादन वाडेकर नॅशनल स्कूल चे संचालक डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी व्यक्त केली. गुरुकुंज मोझरी येथे आयोजित करण्यात आलेल्या सुसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंग मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार निर्माण व्हावे, याकरिता मुलांवर सुसंस्कार होणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, आधुनिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. केवळ गुण आणि स्पर्धा यांवर भर देऊन चालणार नाही, तर मुलांच्या मनात माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. सुसंस्कार शिबिरांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि जीवनाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन विकसित होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले विचार मांडले. सुसंस्कार शिबिर हे समाज घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत अशा उपक्रमांना पालक आणि समाजाने सक्रिय पाठिंबा देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक राजेंद्र साबळे यांनी केले. संचालन आणि आभार अजित वाडेकर यांनी मानले. हे आहेत शिबिराचे विषय शिबिरामध्ये योग व प्राणायाम, प्रार्थना, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी कथा, सांस्कृतिक कार्यक्रम, समूहचर्चा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिरेकापासून दूर ठेवून प्रत्यक्ष संवाद, सहकार्य आणि समूहभावना विकसित करण्यावर भर देण्यात आला.
Source link
सुसंस्कार शिबीर ही आजच्या काळाची खरी गरज:सुसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रघुनाथ वाडेकर यांचे प्रतिपादन