Headlines

मराठवाडा-विदर्भावर पुढील 24 तास संकटाचे:अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा; राज्यातील हवामानात मोठा बदल




राज्यात सध्या हवामानाचा विचित्र खेळ सुरू असून नागरिकांसह शेतकरीही मोठ्या चिंतेत सापडले आहेत. एका बाजूला कडक उन्हामुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे पोहोचला आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तास मराठवाडा आणि विदर्भासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामान बदलताना दिसत आहे. एप्रिल महिन्यापासूनच अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, तर काही भागात उष्णतेने कहर केला. कोकणात दमट आणि उकाड्याचे वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या अडचणीतही मोठी भर पडली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला आणि मालेगावमध्येही तापमान 42 अंशांच्या घरात पोहोचले आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात काही दिवस तापमानात घट झाली होती, मात्र पुन्हा उष्णतेची लाट वाढली आहे. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागत असून उष्माघाताचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त होत आहे. पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतीपिकांवर परिणाम होत असल्याने ग्रामीण भागात चिंता अधिक वाढली आहे. अंदमानात मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता दरम्यान, मान्सूनबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवामान तज्ज्ञ आणि ‘स्कायमेट’ संस्थेच्या अंदाजानुसार, अंदमानात यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. या प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग वाढणार असून त्याचा सकारात्मक परिणाम मान्सूनच्या आगमनावर होणार आहे. यापूर्वी 14 ते 22 मेदरम्यान मान्सून अंदमानात दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र नव्या परिस्थितीनुसार मान्सून आणखी लवकर सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता तरीही यंदाच्या पावसाळ्याबाबत चिंता कायम आहे. हवामान विभागाने अल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जर पावसाळ्यातही अशीच अनिश्चित परिस्थिती राहिली, तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधीपासूनच योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला आहे. मिश्र पीक पद्धती, आंतरपीक आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पीक नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे. कमी पावसाच्या परिस्थितीत उत्पादन टिकवण्यासाठी आधुनिक शेती पद्धतींचा वापर करण्यावरही भर दिला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *