![]()
देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या गोपनीयतेचे धिंडवडे खुद्द राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) दिल्लीतील मुख्य कार्यालयातच उडाले असण्याची धक्कादायक शक्यता आता समोर आली आहे. एनटीएने अत्यंत विश्वासाने नेमलेल्या काही ‘अनुभवी तज्ज
.
नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या (NTA) अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या यंत्रणेला ‘सुरुंग’ लावून नीटचा (NEET 2026) पेपर कसा फोडण्यात आला, याचा अंगावर काटा आणणारा खुलासा सीबीआय तपासातून झाला आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर असून, त्याने अत्यंत हुशारीने आणि सुनियोजितपणे ही ‘मोडस ऑपरेंडी’ राबवल्याचे समोर आले आहे.
‘नीट’मध्ये मनीषा मांढरेचा निर्धास्त वावर
नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मनीषा मांढरे हिच्या ‘एनटीए’मध्ये अतिशय बिनधास्त वावर असल्याचे समोर आले आहे. मनीषा मांढरे या मॉडर्न कॉलेजमध्ये कार्यरत होत्या. मात्र, एनटीएच्या सभागृहात किंवा कार्यालयात वावरताना त्या जणू आपल्या घरातच वावरत आहेत, इतक्या निर्धास्त असायच्या. त्यांना यंत्रणेची खडान् खडा माहिती होती. गेल्या ५ वर्षांपासून त्या एनटीएसाठी ‘विषयतज्ज्ञ’ (Subject Expert) म्हणून काम करत होत्या. त्यामुळे तिथले कामकाज कसे चालते, कोणते अधिकारी कुठे असतात आणि सुरक्षेतील पळवाटा कोणत्या, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. याच दीर्घ अनुभवाचा आणि परिचयाचा गैरफायदा घेत त्यांनी आणि त्यांच्या इतर ज्येष्ठ साथीदारांनी परीक्षेत येणारे नेमके आणि गोपनीय प्रश्न हुडकून काढले व ते छुप्या मार्गाने बाहेर पोहोचवले.
कशी चालते एनटीएची ‘रेफरन्स’ प्रणाली?
एनटीए, जेईई आणि नीट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी देशभरातून शिक्षकांची निवड कशी करते, यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (Junior Colleges) उत्कृष्ट काम करणाऱ्या अनुभवी शिक्षकांची या कामासाठी निवड केली जाते. एका अनुभवी शिक्षकाच्या शिफारशीवरून (Reference) दुसऱ्या शिक्षकाला या गुप्त कामाची संधी दिली जाते. या तज्ज्ञांवर प्रश्नपत्रिका तयार करणे, विषयानुसार नवीन प्रश्न काढणे आणि इंग्रजी प्रश्नांचा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद (भाषांतर) करणे अशी अत्यंत संवेदनशील जबाबदारी सोपवली जाते.
आता आलटून-पालटून नेमणुका करा!
या मोठ्या सुरक्षेच्या त्रुटीनंतर आता एनटीएच्या अंतर्गत वर्तुळातूनच तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “एकाच व्यक्तीला वर्षानुवर्षे अशा संवेदनशील जागी ठेवल्यास यंत्रणेवरचा वचक संपतो. त्यामुळे भविष्यात पेपरफुटी रोखायची असेल, तर अशा विषयतज्ज्ञांची दरवर्षी आलटून-पालटून (Rotation) नेमणूक करणे अत्यंत गरजेचे आहे,” असा सूर आता तज्ज्ञांमधून उमटू लागला आहे.
मोटेगावरनेच ‘नीट’मध्ये माणसे पेरली
मोटेगावकरने केवळ पेपर चोरला नाही, तर थेट NTA च्या मुख्य पॅनलमध्येच आपले माणसे पेरली होती. मोटेगावकरने पूर्वी त्याच्याच क्लासमध्ये शिकवणाऱ्या पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे या दोघांना NTA च्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर बसवण्यात यश मिळवले. वर्षानुवर्षे शिकवण्याचा अनुभव असल्याने कुलकर्णी यांनी केमिस्ट्रीचे आणि मांढरे यांनी बायोलॉजीचे प्रश्न थेट डोक्यात फिट्ट (तोंडपाठ) केले होते. परीक्षा केंद्रातून किंवा कम्प्युटरवरून डेटा चोरीला जाऊ नये म्हणून त्यांनी हुशारी वापरली. प्रश्न लक्षात ठेवून ते बाहेर आले आणि कागदावर हाताने लिहून मोटेगावकरपर्यंत पोहोचवल्याचे समोर आले आहे. मोटेगावकरने या हस्तलिखितांची पीडीएफ बनवून आपल्या मोबाईलमध्ये ठेवली आणि कोट्यवधी रुपयांना ती विकली. ३ मे रोजी परीक्षा संपताच पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता; मात्र सीबीआयच्या सायबर तज्ज्ञांनी तो डेटा रिकव्हर करून मोटेगावकरच्या मुसक्या आवळल्या.
पी.व्ही. कुलकर्णीने फोडले १३२ प्रश्न
वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. आता थेट प्रश्नपत्रिकेच्या भाषांतराची (Translation) जबाबदारी असलेल्या व्यक्तीनेच विश्वासघाताची सीमा गाठल्याचे सीबीआय तपासात समोर आले आहे. रसायनशास्त्राचे (Chemistry) मराठीत भाषांतर करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णी याने तब्बल १३२ प्रश्न मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकरला पुरवल्याचे उघड झाले आहे.
भाषांतराच्या नावाखाली ‘प्रश्न चोरी’चा डाव!
- रसायनशास्त्राच्या पेपरची गोपनीय प्रक्रिया भेदण्यासाठी कुलकर्णीने भाषांतराच्या संधीचा गैरफायदा घेतला.
- चार संच, तीन जबाबदाऱ्या: नीट परीक्षेसाठी रसायनशास्त्राचे एकूण चार संच (Sets) तयार केले जातात, ज्यांचे इंग्रजीतून प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करावे लागते.
- १३५ प्रश्नांची माहिती: यातील तब्बल तीन संचांच्या भाषांतराचे काम प्रल्हाद कुलकर्णीकडे होते. त्यामुळे त्याच्याकडे एकूण १३५ प्रश्नांची थेट माहिती होती.
- १३२ प्रश्न लीक: कुलकर्णीने या १३५ प्रश्नांपैकी तब्बल १३२ प्रश्न चोरून ते ‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’चा चालक शिवराज मोटेगावकर याच्या स्वाधीन केले. उर्वरित दोन संच सुरक्षित ठेवण्यात आले होते, मात्र यापूर्वीही याच पद्धतीने पेपर फुटला असण्याचा दाट संशय सीबीआयला आहे.
‘हस्तलिखित ते पीडीएफ’ व्हाया टेलिग्राम
- सीबीआयच्या चौकशीत या दोघांमधील थेट कनेक्शन आणि प्रश्न पोहोचवण्याची पद्धत स्पष्ट झाली आहे:
- जुने संबंध: कुलकर्णी हा मोटेगावकरच्याच क्लासमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने दोघांमध्ये आधीपासूनच घट्ट आर्थिक आणि व्यावसायिक संबंध होते.
- तोंडी सांगितले अन् लिहून घेतले: भाषांतराचे काम मिळताच कुलकर्णीने ते प्रश्न मोटेगावकरला सांगितले. मोटेगावकरने ते एका कागदावर हाताने लिहून काढले आणि त्याची ‘पीडीएफ’ (PDF) बनवून मोबाईलमध्ये सुरक्षित केली.
- देशभर प्रसार: हीच पीडीएफ पुढे ‘टेलिग्राम’ या सोशल मीडिया ॲपद्वारे देशभरातील विविध दलालांना आणि विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली, ज्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती देशव्यापी झाली.
कसा लागला छडा?
लातूर पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या तपासात मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये रसायनशास्त्राच्या १३२ प्रश्नांची पीडीएफ सापडली होती. त्यानंतर हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला. सीबीआयने तांत्रिक विश्लेषण आणि कुलकर्णीच्या चौकशीतून या संपूर्ण ‘मोडस ऑपरेंडी’चा आणि टेलिग्राम नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.
उद्योगांच्या जागेत थाटले क्लासेस
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच बदनाम झालेल्या लातूरमधील शिक्षण सम्राटांचे आणखी एक काळे कारस्थान चव्हाट्यावर आले आहे. नवीन कारखानदारांना चालना देण्यासाठी सरकारने दिलेल्या कोट्यवधींच्या सरकारी जमिनीवर नियमांची ऐशीतैशी करत खाजगी शिकवणी वर्गांच्या (Coaching Classes) आलिशान इमारती उभारण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी जिल्हा उद्योग केंद्राने आतापर्यंत ‘उद्योग भवन’ला २० हून अधिक नोटिसा बजावल्या आहेत.
सरकारची २६ एकर जमीन अन् नियमांचा ‘गेम’!
- नवीन उद्योगांची निर्मिती व्हावी आणि तरुणांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने लातूर शहराच्या मध्यवर्ती भागातील २६ एकर ३२ गुंठे एवढी अवाढव्य जागा ‘औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेला’ (उद्योग भवन) अत्यंत नाममात्र दराने भाडेतत्त्वावर दिली होती.
- नियम काय सांगतो? या जागेवर फक्त आणि फक्त औद्योगिक कारखाने किंवा उत्पादन युनिट्स सुरू करणे बंधनकारक होते.
- प्रत्यक्षात काय घडले? उद्योगांऐवजी या मोक्याच्या जागेवर गेल्या काही वर्षांत मोठमोठे खाजगी क्लासेस आणि त्यांच्या बहुमजली इमारती बेकायदेशीरपणे उभ्या राहिल्या.
- या नियमबाह्य बांधकामांची गंभीर दखल घेत, केंद्र सरकारने आता या बेकायदेशीर इमारतींवर हातोडा मारण्याचे (पाडण्याचे) आदेश महानगरपालिकेला द्यावेत, असे थेट पत्र राज्य उद्योग संचालनालयाला पाठवले आहे.
क्लासेसना ‘उद्योग’ क्षेत्रात आणण्यासाठी लॉबिंग?
सरकारी यंत्रणेच्या माहितीनुसार, सरकारने अजूनही खाजगी क्लासेसचा समावेश ‘उद्योग’ या व्याख्येत केलेला नाही. सध्या क्लासेसचा समावेश केवळ ‘सेवा क्षेत्रात’ (Service Sector) होतो.
क्लासचालकांचा छुपा अजेंडा: इतर कारखान्यांप्रमाणेच आपल्यालाही सरकारी सवलती, स्वस्त वीज आणि इतर आर्थिक लाभ मिळावेत, यासाठी लातूरमधील अनेक बडे क्लासचालक या क्षेत्राला ‘उद्योगाचा’ दर्जा मिळवण्यासाठी सरकारदरबारी जोरदार प्रयत्न (लॉबिंग) करत असल्याची माहिती समोर आली आहे.
‘आम्ही नियमानेच चालतोय’ – उद्योग भवनचा दावा
या संपूर्ण वादावर लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे चेअरमन अशोक लोया यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले:
“जिल्हा उद्योग केंद्राकडून आम्हाला ज्या नोटिसा आल्या आहेत, त्यांना आम्ही वेळेवर उत्तरे दिली आहेत. आमच्या सर्वसाधारण सभेत (General Body Meeting) जे निर्णय झाले आणि ठरले, त्यानुसारच आमचे सध्याचे कामकाज सुरू आहे. हेच आम्ही प्रशासनाला कळवले आहे.”
‘डॉक्टर-इंजिनिअर बनवण्याची फॅक्टरी’ आता रडारवर!
२० नोव्हेंबर १९६३ रोजी तब्बल ९९ वर्षांच्या करारावर ही जागा नवउद्योजकांसाठी देण्यात आली होती. मात्र, सध्या लातूर हे जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फॅक्टरी’ बनले असून, याच नावाखाली सरकारी जागेचा व्यावसायिक वापर केला जात आहे. नीट पेपरफुटीच्या तपासामुळे आता या क्लासेसच्या बेकायदेशीर साम्राज्यालाही प्रशासकीय सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीबीआयच्या रडारवर आता नाशिकचे नामांकित क्लासेस!
या प्रकरणाची पाळेमुळे केवळ लातूरपुरती मर्यादित नसून ती नाशिकपर्यंत पोहोचली आहेत. अटक करण्यात आलेल्या शुभम खैरनारच्या चौकशीतून अनेक धक्कादायक नावे समोर आली आहेत.
पुढील कारवाई काय असणार?
- नाशिकमधील अनेक नामांकित कोचिंग क्लासेस आणि शिक्षण संस्थांना सीबीआयने नोटिसा बजावल्या आहेत.
- विद्यार्थ्यांचे बँक खाते, डिजिटल पुरावे, फीचे व्यवहार आणि दलालांशी असलेले आर्थिक कनेक्शन सध्या तपासाच्या केंद्रस्थानी आहे.
- संशयास्पद क्लासेसवर कोणत्याही क्षणी सीबीआयचे छापे पडण्याची दाट शक्यता आहे.
- परीक्षेआधीच विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवून कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या या रॅकेटचा पूर्ण बिमोड करण्यासाठी सीबीआयने आता आपला फास आवळला आहे.