![]()
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात आता रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हा प्रकार केवळ लातूरपुरता मर्यादित असल्याचे मानले जात होते, मात्र तपास पुढे जाताच नांदेड, पुणे, नाशिक, वाशीम, जयपूर, गुरुग्रामसह अनेक शहरांमध्ये या रॅकेटची पाळेमुळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार लातूरचा निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी असल्याचे निष्पन्न केले आहे. शिक्षण क्षेत्रात आदराचे स्थान असलेला हा प्राध्यापकच प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अत्यंत गोपनीय पॅनेलमध्ये कार्यरत होता. याच पदाचा गैरवापर करून त्याने पेपरफुटीचे मोठे जाळे उभे केल्याचा आरोप आहे. मोफत टेस्ट सीरिजचे आमिष नीट पेपर लिकच्या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध आणि धक्कादायक होती. सुरुवातीला विद्यार्थ्यांना आणि पालकांना टेलिग्राम व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मोफत टेस्ट सीरिज, दर्जेदार प्रश्नसंच आणि अभ्यास मार्गदर्शन देण्यात येत होते. या माध्यमातून पालकांचा विश्वास जिंकला जात होता. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांना लक्ष्य करण्यात येत होते. लाखो रुपयांनी विकली प्रश्नपत्रिका कोचिंग क्लासेस, एज्युकेशनल कन्सल्टन्सी आणि वैयक्तिक संपर्कांच्या माध्यमातून त्यांच्याशी थेट व्यवहार सुरू होत होते. एका पालकाने दहा लाख रुपये देऊन प्रश्नपत्रिका विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर स्वतःचे पैसे वसूल करण्यासाठी त्याच पालकाने तोच पेपर इतर दोन पालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांना विकल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या घोटाळ्यात पालकांनीच इतर पालकांची फसवणूक केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आलिशान हॉटेलमध्ये गुप्त बैठका परीक्षेच्या दोन दिवस आधी लातूर, पुणे आणि इतर शहरांतील आलिशान हॉटेल्समध्ये या व्यवहारांच्या गुप्त बैठका होत असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. संबंधित पालकांना हॉटेलच्या खोल्यांमध्ये बोलावले जाई. आत प्रवेश करताच त्यांचे मोबाईल जप्त केले जात होते. त्यानंतर त्यांना कथित लाईव्ह, प्रश्नपत्रिका आणि उत्तरे दाखवली जात होती. अर्धी रक्कम आधी, कोट्यवधींचे व्यवहार अर्धी रक्कम आगाऊ आणि उर्वरित रक्कम परीक्षा झाल्यानंतर देण्याच्या अटीवर कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अनेक परराज्यांतील ग्राहक या व्यवहारात सहभागी असल्याने तपास यंत्रणांनी विविध राज्यांमध्ये चौकशीचा वेग वाढवला आहे. सीबीआयच्या कारवाईची चाहूल लागताच अनेक श्रीमंत पालकांनी मोबाईल बंद करून संपर्क तोडल्याची माहिती समोर आली आहे. काहींनी पैसे गेले तरी चालतील, पण चौकशी नको, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण पेपर वेगवेगळ्या भागांमध्ये लीक सीबीआयच्या तपासात पेपरफुटीची संपूर्ण साखळीही उघड झाली आहे. मनीषा वाघमारे नावाच्या महिलेने सुरुवातीला श्रीमंत विद्यार्थी आणि पालक शोधण्याचे काम केले. त्यानंतर धनंजय लोखंडे आणि इतर एजंटांच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका विविध शहरांमध्ये पोहोचवण्यात आली. नाशिकचा शुभम खैरनार, गुरुग्रामचा यश यादव आणि इतर आरोपींनी हा पेपर पुढे फिरवला. आरोपींनी संशय टाळण्यासाठी संपूर्ण पेपर एकाचवेळी न देता विषयानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये लीक केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. रसायनशास्त्राची जबाबदारी कुलकर्णीकडे, तर जीवशास्त्राच्या प्रश्नांची जबाबदारी इतर आरोपींकडे होती. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपयांची वसुली करण्यात आली. घोटाळ्याचे धागेदोरे राजस्थानपर्यंत नीट पेपरफुटीच्या घोटाळ्याचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले आहेत. जयपूरमधून मंगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांना अटक करण्यात आली आहे. आपल्या मुलाला नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी 10 ते 12 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. तपासात 500 ते 600 प्रश्न आधीच पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुरुग्राम आणि नाशिकमधील आरोपींनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे. अनेक ठिकाणी छापेमारी करून मोबाईल, लॅपटॉप, कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींनी डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यासाठी सर्व साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. नामांकित डॉक्टर आणि गर्भश्रीमंत पालकांचाही सहभाग नीट पेपरफुटीच्या घोटाळ्यात काही नामांकित डॉक्टर आणि गर्भश्रीमंत पालकांचाही सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. वाशीममधील एका प्रसिद्ध डॉक्टरने चौकशीच्या भीतीने मोबाईल बंद करून शहर सोडल्याची माहिती समोर आली आहे. नांदेडमध्येही अनेक पालक सध्या संपर्काबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. तपास यंत्रणा आता या आर्थिक व्यवहारांचा माग काढत असून, काळ्या पैशांचा वापर झाला का याचाही शोध घेत आहेत. या प्रकरणात अजून मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पी.व्ही.ची भूमिका महत्त्वाची संपूर्ण घोटाळ्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांची भूमिका. लातूरमधील नामांकित दयानंद महाविद्यालयात त्यांनी जवळपास 28 वर्षे अध्यापन केले होते. रसायनशास्त्र विषयातील त्यांचा मोठा दबदबा होता. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये त्यांची निवड झाली होती. तपासात असे समोर आले आहे की, यंदाच्या नीट परीक्षेतील रसायनशास्त्राचा पेपर त्यांनीच तयार केला होता. त्याच प्रश्नपत्रिकेचा गैरवापर करून त्यांनी काही निवडक विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच प्रश्न आणि उत्तरे पाठ करून घेतली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विशेष गुप्त वर्ग भरवण्यात आले होते. या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना थेट प्रश्न, पर्याय आणि अचूक उत्तरे सांगितल्याचा आरोप आहे. 3 मे रोजी झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेत हेच प्रश्न आल्याने तपास यंत्रणांना मोठा धागा मिळाला. खासगी कोचिंगच्या माध्यमातून मोठे जाळे प्रा. कुलकर्णी यांचे वैयक्तिक आयुष्य आणि संपत्तीही आता चर्चेत आली आहे. लातूरच्या कैलासनगर भागात त्यांचा आलिशान बंगला आहे. पुण्यातही त्यांची मालमत्ता असून तेथेच ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. निवृत्तीनंतरही त्यांनी खासगी कोचिंगच्या माध्यमातून मोठे जाळे तयार केले होते. लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात ‘पी. व्ही.’ म्हणून परिचित असलेल्या या प्राध्यापकाकडे विद्यार्थ्यांचा मोठा ओढा होता. मात्र, शिक्षणाच्या नावाखाली त्यांनी प्रश्नपत्रिकांचा काळाबाजार उभा केल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेलाही मोठा धक्का बसला आहे. देशातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 केंद्रांवर परीक्षा नीट परीक्षा ही देशातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. यावर्षी देशातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीसारख्या प्रकारांमुळे मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेच्या सुरक्षाव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संपूर्ण साखळी तपासाच्या रडारवर सध्या सीबीआयकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी अटकसत्र होण्याची शक्यता आहे. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या यंत्रणांपासून ते एजंट, पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण साखळी तपासाच्या रडारवर आली आहे. शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या या घोटाळ्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
Source link
NEET पेपरफुटीचे धक्कादायक नेक्सस:लातूरचा पी.व्ही.सूत्रधार, आधी टेलिग्राम-व्हॉट्सअपवरून टेस्टचे आमिष, नंतर 10 लाखांना विकले पेपर