Headlines

Raj Thackeray Demands Dharmendra Pradhan Resignation Over NEET Controversy



मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘NEET’ परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘NEET’ परीक्षेचा पेपर लाखो रुपयांना विकला गेला आणि त्याची मुळे महाराष्ट्रात सापडल्याचे समोर येत असताना, केंद्र

.

राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘NEET’ परीक्षा सुरू झाल्यापासूनच त्यांनी त्याला विरोध केला होता. 2016 मध्ये देशभर एकच वैद्यकीय प्रवेश परीक्षा लागू करण्यामागे केंद्र सरकारचा केंद्रीकरणाचा हट्ट होता, असा आरोप त्यांनी केला. या पद्धतीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांना महागड्या कोचिंग क्लासेसचा फायदा होईल आणि ग्रामीण तसेच मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. आता समोर आलेल्या पेपरफुटीच्या प्रकारामुळे त्यांची भीती खरी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी कोचिंग क्लासेसच्या जाळ्यावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर कोचिंग उद्योग उभा राहिला असून, त्यांच्याकडे आर्थिक ताकद आणि व्यवस्था वाकवण्याची क्षमता असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय महाविद्यालये असताना, उत्तर भारतातील विद्यार्थ्यांना या राज्यांत प्रवेश मिळवून देण्यासाठीच ‘NEET’ सारखी परीक्षा लादण्यात आली, असा दावाही त्यांनी केला. तामिळनाडूसह दक्षिणेकडील अनेक राज्यांनी या परीक्षेला विरोध केल्याचे त्यांनी नमूद केले.

राज ठाकरे यांनी ‘NEET’ परीक्षेतील आधीच्या गोंधळांचाही उल्लेख केला. काही विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळणे, ग्रेस मार्क्स देण्याचे प्रकार आणि पेपरफुटीच्या घटना या सर्व गोष्टींमुळे परीक्षेची विश्वासार्हता संपल्याचा आरोप त्यांनी केला. ज्याच्याकडे व्यवस्था वाकवण्याची ताकद आहे, त्यालाच या व्यवस्थेत फायदा मिळतो, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. याचबरोबर, अशा पद्धतीने वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांवर समाजाने विश्वास ठेवायचा का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. त्यांच्या कार्यकाळात ‘NEET’ संदर्भातील अनेक वाद आणि गोंधळ झाले, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यापूर्वीही ‘NEET’ संदर्भातील समस्यांवर आपण थेट पंतप्रधानांशी चर्चा केली होती, मात्र कायमस्वरूपी उपाय करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले.

राज्यातील मंत्र्यांना सुनावले

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारलाही थेट आवाहन केले. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मराठी विद्यार्थ्यांनाच संधी मिळणार नसेल, तर सरकारचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देण्यापेक्षा राज्याच्या हिताची ठाम भूमिका घ्यावी, असे त्यांनी राज्यातील मंत्र्यांना सुनावले. पेट्रोल-डिझेल बचतीचे फोटोसेशन करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवा, असा टोला लगावत त्यांनी महाराष्ट्राने दक्षिणेकडील राज्यांप्रमाणे ‘NEET’विरोधात स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *