![]()
अकरावी प्रवेशाची चौथी म्हणजेच विशेष फेरी सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे प्रवेश काही कारणास्तव निश्चित झाले नव्हते, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही फेरी खुली आहे. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय वाटप (कॉलेज अलॉटमेंट) शुक्रवार, ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांना त्याच दिवसापासून म्हणजे ३ जुलै रोजी दुपारी ४ वाजल्यापासून प्रवेश घेता येत आहे. हे प्रवेश ६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहतील. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना या मुदतीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, जर एखाद्या विद्यार्थ्याला या फेरीत महाविद्यालय अलॉट झाले नसेल, तर त्यांना रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार पुढील विशेष फेरी-२ साठी पसंतीक्रम बदलून अर्ज लॉक करण्याची संधी मिळेल. गेल्या काही वर्षांच्या अनुभवानुसार, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात आणि जिल्ह्यात अकरावीच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांचे कट-ऑफ (प्रवेश पात्रता गुण) ८५ टक्क्यांहून अधिक असले तरी, कला आणि वाणिज्य शाखांच्या तुलनेत विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८,५७० जागा आहेत, तर कला शाखेच्या १८,३०० आणि वाणिज्य शाखेच्या ६,२४० जागा आहेत. एकूण ४३,११० जागांपैकी अजूनही ३१,३६७ जागा रिक्त आहेत. एकदा प्रवेश निश्चित केल्यानंतर तो विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असतो. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्या विद्यार्थ्याने कोणत्याही कोट्यातून (केंद्रीय ऑनलाइन, अल्पसंख्याक, इन-हाऊस किंवा व्यवस्थापन कोटा) आपला प्रवेश एकदा निश्चित केला, तर तो पुढील इतर फेऱ्यांसाठी पात्र ठरत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील फेऱ्या प्रतिबंधित केल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना महाविद्यालयाची निवड अचूकपणे करणे आवश्यक आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ मोबाईलवरील एसएमएसवर अवलंबून न राहता, अकरावी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अमरावती विभाग निवडावा आणि आपल्या लॉगिन आयडीद्वारे कॉलेज अलॉटमेंट तपासावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Source link
अकरावी प्रवेशाची चौथी विशेष फेरी सुरू:प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना 6 जुलैपर्यंत मुदत