![]()
भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक तसेच तंत्रज्ञान सहकार्यातून पुण्यात उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या संदर्भात टोकियो येथील आय. एम. कॉर्पोरेशनचे अध्यक्ष रेन्या किकुची आणि वरिष्ठ सल्लागार ताकाशी इतामिया यांनी पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची सदिच्छा भेट घेतली. टोकियो स्थित फिडेलसॉफ्टचे संस्थापक अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. यावेळी जपानी प्रतिनिधींनी रोजगारावर आधारित नवीन संकल्पनांची माहिती दिली. भारत आणि जपानमधील तंत्रज्ञान सहकार्य अधिक दृढ होण्यास या उपक्रमामुळे मदत होणार आहे. आय. एम. कॉर्पोरेशनने भारतात उद्योग विस्तारासाठी अनेक प्रमुख शहरांचा विचार केला होता. पुण्याची संस्कृती, जपानी भाषेविषयीची आस्था, दर्जेदार तांत्रिक मनुष्यबळ, उत्कृष्ट शैक्षणिक संस्था, नवउद्योगांसाठी अनुकूल वातावरण, संशोधन आणि जागतिक दर्जाची माहिती तंत्रज्ञान परिसंस्था या घटकांमुळे हैदराबादऐवजी पुणे शहराला प्राधान्य देण्यात आले, असे सुनील कुलकर्णी यांनी सांगितले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे येत्या पाच वर्षांत पुण्यात एक हजारांहून अधिक उच्च कौशल्याधारित रोजगार निर्माण होतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, सॉफ्टवेअर विकास, डिजिटल अभियांत्रिकी, संशोधन, जागतिक सेवा केंद्रे आणि उच्च दर्जाच्या तंत्रज्ञान प्रकल्पांना या गुंतवणुकीमुळे मोठी चालना मिळणार आहे. यावेळी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्राची कुलकर्णी तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. दीपक शिकारपूर यांनी या उपक्रमात महत्त्वाची समन्वयक आणि प्रेरक भूमिका बजावली आहे. भविष्यात या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ, कौशल्यविकास, शैक्षणिक संस्थांशी समन्वय आणि उद्योग–शिक्षण दुवा अधिक मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. शिकारपूर यांनी दिले. यामुळे पुणे जागतिक माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अधिक बळकट होईल. महापौर मंजुषा नागपुरे यांनी जपानी प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले. पुणे महानगरपालिका या प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व प्रशासकीय सहकार्य आणि सकारात्मक पाठबळ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुणे हे देशातील अग्रगण्य ज्ञाननगरी आणि माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र असल्याने या गुंतवणुकीमुळे शहराच्या आर्थिक विकासाला आणि रोजगारनिर्मितीला नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत–जपान उद्योग सहकार्य झपाट्याने वाढत असल्याने जपानी भाषा अवगत असलेल्या तरुणांना जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान सानाये ताकाईची यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेतील भारत–जपान औद्योगिक आणि तंत्रज्ञान सहकार्याच्या व्यापक दृष्टीकोनाचा महत्त्वपूर्ण भाग मानला जात आहे.
Source link
पुण्यात पाच वर्षांत हजारो उच्च कौशल्याधारित रोजगार:जपानी कंपनीच्या गुंतवणुकीला महापौरांकडून सहकार्याचे आश्वासन