![]()
चांदूर रेल्वे येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि नगरसेविका कल्पना लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत समस्या सोडवण्याचे मान्य केले. चांदूर रेल्वे शहर, विशेषतः छत्रपती शिवाजी नगर भागात, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिवस-रात्र तासनतास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे सामान्य नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. अंधारामुळे घरगुती कामे थांबली असून महिलांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. मोर्चादरम्यान वीरेंद्र जगताप यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. “शहरातील आणि प्रभागातील वीजपुरवठा सुरळीत का ठेवला जात नाही? मेंटेनन्सच्या नावाखाली फक्त कागदोपत्री कामे केली जात आहेत का?” असे संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केले. वीज कंपनीच्या देखभाल कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला. आंदोलनाचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवाजी नगरमधील महिलांचा वाढता रोष आणि वीरेंद्र जगताप यांचा कडक इशारा पाहून वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली. त्यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले की, शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची कारणे शोधून येत्या तीन दिवसांत सर्व तांत्रिक समस्या सोडवण्यात येतील आणि वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. या आंदोलनात अमोल होले, अनिस सौदागर, श्रीनिवास सूर्यवंशी, राजीव लांजेवार, प्रफुल्ल कोकाटे, रुपेश पुडके, सागर गरुड, सतपाल वरठे, रितेश शेळके, रोहित बाबर, राजश्री माने, आशा गरुड, पूजा यादव, सारिका हटवार, पद्मा हटवार, मेघा जाधव, अश्विनी कवळकर, ज्योती राऊत, संजीवनी राऊत, वंदना माने, मंगला गिरपुंजे, पूजा मेहरे, संगीता आगाशे, माया लांजेवार, अनिकेत धुर्वे, सविता लांजेवार, दीपाली राठोड, उषा बाबर, सुजाता राऊत, अलका उईके, रेखा छकुले, रोहिणी देशमुख, सुनिता राऊत, किरण गिरपुंजे, वैशाली गजभिये, वेदांत श्रीखंडे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
Source link
अनियमित वीजपुरवठ्यामुळे काँग्रेसचा महावितरणवर मोर्चा:तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन