Headlines

पुण्यात देशी पिस्तूल बाळगणारा सराईत आरोपी अटकेत:धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरातून गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हा दाखल




गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश सुरेश ढोरे (वय ३८, रा. शिव कॉलनी, आंबेगाव पठार, धनकवडी) असे आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी शिवानंद कायगुडे आणि उज्ज्वल मोकाशी यांना ढोरे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून तो आंबेगाव पठार परिसरात थांबल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, सर्जेराव सगर, संतोष टकले, शंकर नेवसे, शंकर कुंभार, नागनाथ राख, विजयकुमार पवार आणि विशाल दळवी यांच्या पथकाने केली. तरुणीच्या घरात मित्राकडून चोरी दुसरीकडे, कोंढवा भागात एका तरुणीच्या घरातून तिच्या मित्राने सहा लाख २४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी तरुण तिचा मित्र आहे. २५ जून रोजी तो कोंढव्यातील त्याच सोसायटीत राहणाऱ्या त्याच्या मावशीला डबा देण्यासाठी आला होता. त्यावेळी तरुणी घरात असताना त्याने तिच्या नकळत कपाटातून सोन्याचे दागिने चोरले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक आनंद थिटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *