![]()
अमरावती जिल्ह्यात रविवार, २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली आहे. परीक्षेच्या एक दिवस आधी हा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यातील १८ हजारहून अधिक परीक्षार्थी शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. यापूर्वी ही परीक्षा गेल्या आठवड्यात होणार होती, परंतु तयारी पूर्ण न झाल्याने ती एक आठवडा पुढे ढकलण्यात आली होती. आता पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याने, संबंधित शिक्षकांना पुढील परीक्षेसाठी किती दिवस वाट पाहावी लागेल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. शासनाने सप्टेंबर २०२८ पूर्वी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे नोकरी टिकवण्यासाठी अनेक शिक्षक ही परीक्षा देत आहेत. अमरावती जिल्ह्यात एकूण १८ हजार ११९ शिक्षकांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ज्यात ७ हजार ३९१ प्राथमिक आणि १० हजार ७२८ माध्यमिक शिक्षक होते. या परीक्षेसाठी अमरावती तालुक्यात ३८ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक शिक्षकांनी वेळेत केंद्रांवर पोहोचण्यासाठी आधीच तयारी केली होती, काही जण तर प्रवासालाही निघाले होते. मात्र परीक्षा रद्द झाल्याने त्यांना आता पुन्हा वाट पाहावी लागणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात नियोजित होती. पहिली ते चौथीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत, तर सहावी ते आठवीच्या माध्यमिक शिक्षकांसाठी दुपारी २.३० ते ५ या वेळेत परीक्षा होणार होती. प्राथमिक शिक्षकांसाठी २४ आणि माध्यमिक शिक्षकांसाठी ३८ केंद्रांवर तयारी करण्यात आली होती. जिल्हा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच सर्व परीक्षा केंद्रांवरील सोयी-सुविधांचा आढावा घेतला होता. समितीचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी आणि सचिव शिक्षणाधिकारी सतीश मुगल व प्रिया देशमुख यांनीही परीक्षेची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, पेपरफुटीमुळे ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने या सर्व अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. काही शिक्षकांनी वाहतूक कोंडी किंवा इतर अडचणी टाळण्यासाठी शनिवारी सकाळीच परीक्षा केंद्रांच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. मात्र, प्रवासातच त्यांना पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याची बातमी मिळाली आणि त्यांना निराश होऊन घराकडे परत फिरावे लागले.
Source link
पेपरफुटीमुळे टीईटी रद्द, अमरावतीतील शिक्षकांचा हिरमोड:18 हजार परीक्षार्थींना अनिश्चिततेचा सामना, परीक्षा कधी होणार?